Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी भरला अर्ज, कोण मारणार बाजी?

Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरीत कोणांमध्ये थेट लढत? पाहा कोण आहेत उमेदवार.

Updated: Oct 15, 2022, 06:04 PM IST
Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी भरला अर्ज, कोण मारणार बाजी? title=

Andheri byelection : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातीला राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. त्यात विधानसभेची पोटनिवडणूक लागल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणुकीला (Andheri East Byelection) मुंबई महापालिकेची (BMC Election) सेमीफायनल म्हणून देखील पाहिलं जात आहे. कारण या निवडणुकीतील निकाल मुंबई महापालिका निवडणुकीचं चित्र स्पष्ट करणार आहे. उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) सहानुभूती मिळते का की एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय बरोबर ठरतो हे अंधेरीतील मतदार ठरवणार आहेत. आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.

अंधेरी पूर्ण विधानसभा (Andheri Byelection) पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) आणि भाजप (BJP) यांच्यात ही थेट लढाई असणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भारतीय जनता पक्षाकडून मुरजी पटेल हे रिंगणात आहेत.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी एकूण 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. क्रांतिकारी जयहिंद सेना आणि हिंदुस्तान जनता पार्टीचे राकेश विश्वनाथ अरोरा, अपक्ष मिलिंद काशिनाथ कांबळे आणि अपक्ष नीना गणपत खेडेकर यांनी देखील अर्ज भरला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्यासह संदीप नाईक (sandeep naik) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदीप नाईक हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत. ते माजी नगरसेवक देखील आहेत. ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली तर संदीप नाईक निवडणूक लढवतील. पण तसं झालं नाही तर नाईक हे अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे नाईक यांच्यानंतर आणखी कोणी अर्ज मागे घेतं का याकडे ही अंधेरीतील मतदारांचं लक्ष असणार आहे.