Raj Thackeray On Maratha Reservation:  मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे, समाजाने जागृत राहावे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Maratha Reservation)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत तामिळनाडूच्या एका प्रकरणाचा धागा जोडत सरकारवर सवाल उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूतदेखील असेच प्रकरण घडलं होतं. राज्य सरकारने आरक्षण दिले आणि ती केस अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याचे पुढे काहीही झालं नाहीये. राज्य सरकारला मुळात यात अधिकार आहे का. हा विषय केंद्र सरकारचा असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आहे. सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद मानण्याचा हा विषय नाही, असं राज यांनी म्हटलं आहे. 


10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय?


सरकारने 10 टक्के आरक्षण दिले म्हणजे नेमकं काय केलं? कशात 10 टक्के आरक्षण दिले?  हे मराठा समाजाने सरकारला विचारलं पाहिजे. सरकारला या गोष्टीचे अधिकार आहेत का? परत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि पुन्हा सरकार म्हणणार आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आम्ही काही करु शकणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या याला काही अर्थ आहे का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.


राज्य सरकारला मुळात अधिकार आहे का या सगळ्याचे. आज देशात इतकी राज्य आहेत. त्या राज्यात अनेक जाती आहेत. त्यांचे पण विषय आहेत. एका राज्यात एका जातीबद्दल असं नाही करता येत. या सगळ्याकडे समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे, असं अवाहन राज यांनी केलं आहे. 


ओबीसी वि. मराठा


सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशी सामाजिक तेढ निर्माण झाली आहे. यावरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राज्यात सध्या काय सुरू आहे. काहीच कळत नाहीये. राज्यासमोर मोठे भीषण प्रश्न आहे. फेब्रुवारी महिना आहे आणि आत्ताच दुष्काळाचा पाण्याचा प्रश्न इतका मोठा आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. निवडणुका, जाती-पातीचे राजकारण, आरक्षण याकडे सर्वांचे लक्ष वळवायचे आणि मुळ जे प्रश्न आहे त्याकडे दुर्लक्ष करायचे. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर राज्यात वा देशात काहीच सुरू नाहीये, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.