Raj Thackeray Speech: आज मनसेचा 18 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे या निमित्ताने 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. काळरामाचे आरती करून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली आहे. आज भाभा नगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनसे मिळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. राज्यातील काही निवडक लोकसभा मतदारसंघ ते लढवण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी व्याख्यान ठेवणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. ज्यांना राजकीय महत्वकांक्षा आहे त्यांनीच यावं असेही ते म्हणाले.  माझ्याही बाबतीत सोशल मीडियात काहीही टाकतात. गाडी येते, मी खाली उतरतो.. आणि बॅकग्राऊंडला रारारा..असं काहीतरी चालू असतं. हे कोणीही पाहत नाहीत. तुमच्या पोस्टमधून त्यांना काही मिळणार असेल तरच लोक पाहतात.


महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा ठरवल्याचे ते म्हणाले. आज पक्षाला 18 वर्षे पूर्ण होत आहेत. तुम्हाला राजकीय इतिहास सांगावा लागेल. राजकारणात तुम्हाला टिकायच असेल तर तुम्हाला पेशन्स लागतील. इतर राजकीय पक्षांचे यश तुम्हाला आता दिसतंय.मोदींचं यश हे झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं यश आहे. 1952 साली त्यांचा पक्ष स्थापन झाला. यानंतर आडवाणी, अटलजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अशा अनेकांनी खस्ता खाल्ल्या. त्यातून आलेलं हे यश आहे. अचानक मिळालेलं हे यश नाही. 


गेल्या 18 वर्षात मी माझ भाग्य समजतो. मी चढ कमी पाहिले आणि उतारच जास्त पाहिले. पण यासर्वात तुम्ही माझ्यासोबत होतात. यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार. पण पेशन्स लागतात. तो नसेल तर गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायचीयत. दुसऱ्यांची पोर कडेवर घेऊन फिरवण्यात आनंद मिळतो. तसंल नकोय मला. मला भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत पण त्या गुढीपाडव्याला शिवतिर्थावर बोलेन असे ते म्हणाले. 


माझ्यासकट अनेक कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला. सुरुवात करतात शेवट करत नाहीत, असा आरोप आपल्यावर केला जातो. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झालं नाही?, पंतप्रधान फुलं वाहून गेले त्याचं पुढे काय झालं? 


मनसेमुळे मोबाईलवर मराठी ऐकू येऊ लागलं. 62-67 टोलनाके बंद झाले. आमची भूमिका स्वच्छ आहे. मुंबई-गोवा रस्ता, मुंबई-नाशिक रस्ता भीषण आहे आणि तुम्ही टोल घेता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो. त्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकता? एकदा राज्य माझ्या हातात द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो, असे ते म्हणाले. समुद्र किनारी अनधिकृत दर्गा बांधत होते. पालिका, पोलिसांच्या का लक्षात आलं नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. 


बाकिच्यांनी जो विश्वास घालवलाय तो विश्वास आपल्याला मिळवायचाय, असे ठाकरे यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीचे सगळे आतून एकच आहेत. फक्त तुम्हाला मुर्ख बनवतायत. आपापलं राजकारण सुरु आहे. पण महाराष्ट्राची माती होतेय.


जरांगेंना मी स्पष्ट सांगितलं होतं की हे होणार नाही. तांत्रिदृष्ट्या हे होऊ शकत नाही. मागे मोर्चे निघाले होते. काय झालं पुढे? यांच्या भुलथापांना बळी पडू नका. आज नोकरी, शिक्षणाचा प्रश्न आहे. बाहेरच्या राज्यातील लोक आम्ही पोसायची आणि आमची लोकं आंदोलनं करणार? राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण रोजगार देणं महाराष्ट्राला शक्य आहे. पण वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवलं जातं. तुमची मत विभागली जातील तेवढं यांच्या फायद्याचं असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 


जे जे माझ्यासाठी शक्य असेल ते या मराठी माणसासाठी आणि हिंदुसाठी करेन, अशी शपथ घेण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले. जातीपातींशिवाय आपल्याला महाराष्ट्र उभा करायचाय. पक्षातही जातपात करायची नाही, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 


विचार करणं याला काम करणं असं आपल्याकडे मानलं जात नाही. काहीवेळा तुमच्यासमोर वेगळ चित्र निर्माण केलं जातं. नशिब महाराजांच्या वेळेला सोशल मीडिया आणि पत्रकार नव्हते. नाहीतर महाराज महाराज, गनिमी कावा काय आहे, हे सांगा..असे म्हणाले असते.