मोदींचा उल्लेख करत Raj Thackeray यांचा भाजापाला इशारा; म्हणाले, `भाजपानेही लक्षात ठेवावे आज...`
Raj Thackeray Thane Program: राज ठाकरेंनी आज ठाण्यामधील गडकरी रंगायतनमध्ये पक्षाच्या 17 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी दिलेल्या भाषणातून त्यांनी केलं सूचक विधान.
Raj Thackeray Thane Program: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये पक्षाचा 17 वा वर्धापन दिन साजरा केला. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी 17 वर्षांमध्ये काय केलं याचा लेखाजोखा मांडला. मात्र यावेळी त्यांनी कायमच मनसेलाचा का प्रश्न विचारले जातात असं म्हणत प्रसारमाध्यमांवर टीका केली. विशेष म्हणजे यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत थेट भारतीय जनता पार्टीलाच सूचक शब्दांमध्ये इशारा दिला.
प्रसारमाध्यमांवर टीका
"आपल्याला प्रश्न विचारतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते. मग निवडणुकीला मतं का नाही पडत? अरे मग ते 13 आमदार सोरटवर निवडून आलेले का?" असा प्रश्न राज यांनी विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. यावर महिला कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद दिल्याने राज यांनी हसून, "मला सोरटचा रिस्पॉन्स यांच्याकडून (पुरुषांकडून) ठीक आहे पण महिलांकडून सोरटचा रिस्पॉन्स..." असं म्हणाले. पुढे बोलताना राज यांनी, "हा एक प्रपोगांडा आहे. सगळेच नव्हे पण काही पत्रकार अनेक पक्षांना बांधलेले आहेत. ते पूर्वी असायचं ना एक चित्र गाढवाला चालायला काठी लावून गाजर लावलेलं असतं. त्यांना काठी लावून पुढे पाकीट लावलेलं असतं," असं म्हणत राज यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केली.
भाजपाला इशारा
पुढे बोलताना राज यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. "2014 आणि 2017 सालाचं विचारतात. नरेंद्र मोदींची लाट होती. मला काय विचारता 17 वर्षात काय केलं. ज्या पक्षाने 60-65 वर्ष राज्य केलं त्या काँग्रेस पक्षाची अवस्था बघा," असं म्हणत राज यांनी काँग्रेसवर टीका केली. त्याचवेळी राज ठाकरेंनी भाजपालाही इशारा दिला. "भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती येतच असते. भाजपानेही लक्षात ठेवावे आज भरती चालू आहे. ओहोटी येऊ शकते. नैसर्गिक गोष्ट आहे ओहोटी येऊ शकते," असं म्हणत राज यांनी सूचकपणे सध्या ज्या पक्षाशी त्यांनी जवळीक साधली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे त्याच पक्षाला इशारा दिला.
शिवसेना-भाजपा युतीला टोलवरुन टोला
"या सगळ्या कालखंडामध्ये पुढे जात असताना आमचा राजू पाटील पक्षाची बाजू एकटा विधानसभेत मांडतोय. त्या 'शोले' चित्रपटामध्ये म्हणतात ना तसं एकही है लेकीन काफी है. विधानसभा (मनसेच्या आमदारांनी) भरली तर काय होईल यांचं?" असं राज म्हणाले. "जाणून बिजून असा (मनसेविरुद्ध) प्रचार केला जातो. ज्यांच्याकडून हे लिहिलं, बोललं जातं हे कुठे ना कुठे समजून न घेता कोणीतरी सांगितलेलं असतं की या या प्रकारचा प्रचार करा. मग पत्रकार तसा प्रचार करतात. एवढी गर्दी जमते मतं जातात कुठे? असं विचारतात. आंदोलन अर्ध्यात सोडतात म्हणतात एक आंदोलन दाखवा. सगळी जबाबदारी आमच्यावर आहे का? जे पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात ते इतर पक्षांना विचारणार नाही. तुमच्यामुळे 65 ते 70 टोलनाके बंद झाले. तेच अडीच वर्षापूर्वी भाजपा शिवसेना म्हणालेले आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करु असं जाहीरनाम्यात म्हणाले होते. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. तुमच्या मनात संभ्रम निर्माण करायचा एवढाच हेतू आहे," असं राज म्हणाले. मनसेनं 17 वर्षात काय केलं यासंदर्भातील एक पुस्तिका यावेळेस प्रकाशित करण्यात आली.
नक्की वाचा >> MNS Vardhapan Din: ...म्हणून मुख्यमंत्रीपदावरुन जावं लागलं! जाहीर भाषणात Raj Thackeray यांचा उद्धव ठाकरेंना टोला
नाशिकवाले हळहळत आहेत
"लोकांना काय हवं आहे मला कळत नाही. पाच वर्षात म्हणतात कामं नाही झाली. आणि मतदान करताना भलत्याच विषयावर मतदान करुन बसतात. नाशिकमध्ये पहिल्या पाच वर्षात झालं तेवढं मोठं काम 20 ते 25 वर्षात झालं नाही असं तिथले लोक सांगतात मला. नाशिकमध्ये पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही. नाशिकमध्ये पुढल्या 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. बाकी रस्ते वगैरे गोष्टी केल्याच. आता तिथले लोक हळहळतायत. पण ते निवडणुकीच्या वेळेस असेल की नाही ठाऊक नाही," असंही राज म्हणाले.