Raj Thackeray post : शालेय चित्रकलेशी संबंधित उत्पादनांची निर्मिती करणारा जगप्रसिद्ध उद्योगसमूह 'कॅमलिन'चे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर (Subhash Dandekar) यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  'कॅमलिन' हा ब्रँड जगभरात पोहोचवण्यात सुभाष दांडेकर यांचा मोठा वाटा होता. पेन्सिल, कंपास, विविध रंग, शाई, मार्कर, गणितासाठीचे साहित्य, कार्यालयीन स्टेशनरी संबंधित उत्पादनं बनवण्यात 'कॅमलिन'चा खूप मोठा हात होता. अशातच आता सुभाष दांडेकर यांच्या निधनामुळे राज्याच्या औद्योगिक वर्तुळात दुःख व्यक्त केलं जातंय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुभाष दांडेकरांना आदरांजली वाहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आदरांजली वाहिली. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरेंची पोस्ट वाचा जशीच्या तशी...


राज ठाकरे लिहितात...


कॅम्लिन' च्या सुभाषजी दांडेकरांचं आज निधन झालं. सुभाषजी दांडेकर आणि कॅम्लिनशी या दोहोंशी माझा जुना ऋणानुबंध. माझा 'कॅम्लिन'शी संबंध पहिल्यांदा आला, तो कॅम्लिनच्या कंपास पॆटीमुळे. त्याकाळात उंटाची नाममुद्रा असलेली कॅम्लिनची आखीवरेखीव कंपासपेटी सगळ्यांकडेच असायची. कॅम्लिन सोडून दुसऱ्या कंपास पेटीचा विचारच करता येत नव्हता . फुटपट्टी, खोडरबर ते पेन्सिलपर्यंत प्रत्येक गोष्ट कॅम्लिनचीच असायची.  पुढे कॅम्लिनचा ब्रश, कलर हातात आले. खरतर लहानपानापासूनच कॅम्लिनच्या रंगात मी रंगून गेलो होतो .


पण 'कॅम्लिन' हा ब्रँड किती मोठा आहे हे मात्र त्या वयात जाणवलं नव्हतं. १९३१ ला वेधशाळेत काम करणाऱ्या आणि महापालिकेत काम करणाऱ्या उच्चशिक्षित बंधूनी नोकरी सोडून सुखासीन सरकारी नोकरीचा ध्यास सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा आणि तो देखील शाई बनवण्याचा. वेधशाळेत ढग कसे जमा होतात हे बघण्याच्या ऐवजी लोकांनी तेच ढग आपल्या रंगाने रंगवावेत असं का वाटलं असावं हे त्यांनाच माहीत.  शाईच्या पासून सुरु झालेला प्रवासाने, 'कॅम्लिन'च्या ब्रॅण्डची ठळक मुद्रा जगभर उमटवली. 'उंट' ही कॅम्लिनची नाममुद्रा, महाराष्ट्रात न दिसणारा प्राणी नाममुद्रा म्हणून का घेतला याची कथा मला एकदा दांडेकरांनी सांगितलं होता. 


शाई ते फाउंटन पेन्स, पेन्सिली, रंगवण्याचे ब्रश, क्रेयॉन्स पासून अनेक प्रकारचे रंग, खोडरबर ते ऑफिसेसला लागणाऱ्या स्टेशनरीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कॅम्लिनने बनवल्या.  इंग्रजीत एक म्हण आहे जिचा भावार्थ आहे, 'उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट खाली बसला'. पण दांडेकरांच्या उंटाला कलात्मक उत्पादनाचं कधीच ओझं झालं नाही. मराठी उद्योजकाने घेतलेली ही लक्षणीय उडी. 


पुढे काळाच्या ओघात इतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या, पण 'कॅम्लिन'च्या उत्पादनांमध्ये जी एक सौंदर्यदृष्टी आहे, ती मात्र कुठल्याच उत्पादनांमध्ये दिसत नाही. 


जागतिकरणाच्या ओघात कॅम्लिनचा मोठा हिस्सा 'कोकुयो' नावाच्या जॅपनीज कंपनीने घेतला. पण जे मोजके मराठी ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले, त्याची दखल जगाने घेतली त्यात 'कॅम्लिन' हा एक महत्वाचा ब्रँड. आज सुभाष दांडेकरांच्या निधनानंतर हा सगळा पट डोळ्यासमोर आला. 'कॅम्लिन' या ब्रँडच्या प्रवासाने किंवा एका उंटाच्या नाममुद्रेच्या प्रवासातुन मराठी मनांनी प्रेरणा घेऊन, मोठी स्वप्न पहायला हवी आणि अर्थात ती प्रत्यक्षात पण उतरवायला हवी.