प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर (Rajapur) तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे (Journalist Shashikant Warise) यांचा संशयस्पद अपघाती (Accident) मृत्यू झाला. त्यानंतर आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांनी यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला असून वारिसे यांनी प्रसिद्ध केलेली बातमी आणि त्यांचा मृत्यू यांचा काही संबंध आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शशिकांत वारिसे अपघातात जखमी झाले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वारिसे यांच्या दुचाकीला कारची धडक
शशिकांत वारिसे सोमवारी नेहमीप्रमाणे कामानिमित्त राजापूरला गेले होते...अचानक त्यांच्या घरच्यांना त्यांचा अपघाताबाबत फोन आला. शशिकांत वारिसे राजापूर इथल्या पेट्रोलपंपावर आपल्या दुचाकीवर होते. यावेळी त्यांना वेगानं आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar)  याच्या थार गाडीची जोराची धडक बसली. त्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूर इथं मृत्यू झाला.  हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी आणि निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे. त्याबाबतची तक्रार देखील पोलिसांकडे दिली आहे.


वारिसेंच्या कुटुंबाचा आक्रोश
शशिकांत यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यात दोषी असणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. 


काय होती ती बातमी?
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो अशा आशयाच्या बातमीचं कात्रण वारीसे यांनी शेअर केलं होतं. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनरसंदर्भात ही बातमी होती. या बातमीचं कात्रणत्यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये टाकलं होतं. त्यानंतर दुपारी त्यांच्या दुचाकीला कारची धडक बसली.



बातमी लावल्याने वारिसेंचा घात?
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या अपघातानंतर सुरू असलेल्या चर्चा देखील महत्त्वाच्या आहे. कारण, ज्या दिवशी वारिसे यांचा अपघात झाला त्याच दिवशी त्यांनी एक बातमी प्रसिद्ध केली होती. वारिसे यांनी प्रसिद्ध केलेली बातमी हि रिफायनरी समर्थकांचे नेते म्हणून ओळख असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर यांच्याबाबतची होती आणि याच पंढरीनाथ आंबेकर याच्या गाडीनं वारिसे यांच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर पंढरीनाथ आंबेरकर फरार झाले. त्यांना सोमवारी रात्री कणकवली इथून पोलिसांनी अटक केली. पंढरीनाथ आंबेकर याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302 आणि 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.