कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गोंधळाच्या वातावरणात पार पडली. महादेवराव महाडिक आणि काँग्रेस आमदार  सतेज पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.त्यामुळे ही सर्वसाधारण सभा अवघ्या काही मिनिटांमध्ये आटोपण्यात आली. सतेज पाटील गटाच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत सभा स्थानी पत्रके भिरकावली. त्यामुळे काहीवेळ महाडिक आणि पाटील समर्थक आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या समर्थकांना बाजूला केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे गोंधळ उडाला. कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते सभामंडपातच आमने-सामने येत जोरदार घोषणाबाजी  करत एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला; त्यामुळे  सभा स्थळी गोंधळ उडाला.
 श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल कसबा बावडा इथल्या कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. गेल्या पंधरा दिवसापासून कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्यावरुन वाकयुद्ध सुरू होते. त्यामुळे याचे पडसाद आजच्या राजाराम कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटणार हे निश्चित होते.


सकाळी अकरा वाजता कसबा बावडा इथल्या कारखान्याच्या कार्यस्थळावर सभा सुरु होताच महाडिक समर्थकांनी सभामंडपात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याला प्रत्युत्तर देत आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी करायला सुरुवात केली. चाळीस मिनिटे चाललेल्या सभेमध्ये महाडिक समर्थकांनी आणि पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांच्या अंगावर धावून जात गोंधळ घातला. या सभेचे पडसाद गोकुळ दूध संस्थेच्या वार्षिक सभेत देखील उमटतील असे चित्र आहे.