जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : राज्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून चारा आणि पाण्यासाठी जनावरे त्रस्त आहेत. पाण्यासाठी गावाकडील महिलांना वणवण भटकावे लागत असताना मंत्री केवळ दुष्काळी पर्यटन करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून विदर्भ, मराठवाडा दौरा सुरु केला आहे. यावेळी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील मतदान प्रक्रिया संपल्यावर दुष्काळाविषयक उपाययोजना तात्काळ सुरु करणे आवश्यक होते मात्र राज्य सरकारने याबाबतही तत्परता दाखवली नाही. तर केंद्र सरकराचा शपथ विधी होऊन २ आठवडे उलटले परंतु परिणामकारक उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. दुष्काळाविषयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. मात्र तरीही प्रशासनाच्या दमनशाहीला न घाबरता स्वाभिमानी शेतकरी पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरणार असल्याचे शेट्टींनी यावेळी सांगितले. 


शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली. तसेच सरकारने साखर कारखान्याकडे उपलब्ध असलेली साखर खरेदी करावी अशीही मागणी राजू शेट्टी यांनी केली... लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे सांगत ईव्हीएम बाबत खूप काही घटना संशय निर्माण करणाऱ्या असून या शंका दूर करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. 



आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सेनेला पराभूत करण्यासाठी समविचारी विरोधकांनी एकत्र येणायची गरज आहे. यापूर्वी सुद्धा विरोधकांनी एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि पुढेही प्रयत्न करणार असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. शिवाय वंचित बहुजन आघाडीने देखील सोबत येण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले मात्र विधान सभा निवडणूक स्वतः लढणार की नाही याबाबत आत्ताच काही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.