Who is Medha Kulkarni : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तीन जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. नुकतंच भाजपकडून याबाबतची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे. तर मेधा कुलकर्णी या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार आहेत. मेधा कुलकर्णी यांचा अल्पपरिचय आपण जाणून घेऊ. 


मेधा कुलकर्णी यांचा अल्पपरिचय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेधा कुलकर्णी यांना पक्षनिष्ठतेचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. मेधा कुलकर्णी यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1969 रोजी पुण्यातील सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉक्टर आणि आई शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कुटुंबात शिक्षणाला प्रचंड महत्त्व होते. मेधा यांच्या कुटुंबात राजकारणाऐवजी समाजकारणाला विशेष महत्त्व होते. मेधा कुलकर्णी यांचे वडील गोवा मुक्ती संग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळेच समाजाला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा आपण त्यांच्या मदतीला जावं, अशी शिकवण मेधा कुलकर्णी यांना लहानपणीपासूनच मिळाली होती. मेधा कुलकर्णी या 1984 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर 1986 मध्ये त्या बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेचा पदवीधर म्हणून शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी 1994 मध्ये पुणे विद्यापीठातून M.Ed ही पदवी मिळवली.


नगरसेविका म्हणून कार्यरत


मेधा कुलकर्णी यांच्या वडिलांचा पोर्तुगीजांची सत्ता पुण्यात घालवण्यात मोठा वाटा होता. मेधा कुलकर्णी यांच्यात त्यांच्या वडिलांकडूनच नेतृत्व करण्याची कला मिळाली. मेधा कुलकर्णी यांचे पती विश्राम कुलकर्णी हे भारतीय जनता पक्षाचे काम करत होते. लग्नानंतर त्यादेखील पतीसह राजकीय क्षेत्रात सक्रीय झाल्या. मेधा कुलकर्णींनी सुरुवातीला भाजपच्या पुणे शहराच्या महिला मोर्चा पदाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर 2002 मध्ये त्यांना पुणे महापालिकेच्या नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर 2002, 2007 आणि 2012 असे सलग तीन वेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केले. 


2019 ला चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तिकीटाची नाकारणा


यानंतर मेधा कुलकर्णी यांना आमदारकीसाठी तिकीट मिळाले. त्यांनी 2014 ते 2019 या काळात कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पण त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून आमदारकीचे तिकीट देण्यात आले. यामुळे मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या. त्यांनी अनेकदा आपली नाराजीही बोलून दाखवली होती. मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना या ठिकाणी असलेल्या ब्राह्मण समाजामध्येही होती. 


भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी


यानंतर भाजपकडून मेधा कुलकर्णी यांची राजकीय पुनर्वसन करण्यात आले. 2021 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. कुलकर्णी यांच्या रुपाने पुण्यातील महिलेला पहिल्यांदाच एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची संधी मिळाली होती. महाराष्ट्रातून महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या त्या एकमेव पदाधिकारी होत्या. 


पती विश्राम कुलकर्णी मोठे व्यावसायिक


मेधा कुलकर्णी यांनी राजकारणात सक्रीय झाल्यापासून महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट काम केली आहेत.  काही वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात मराठी भाषा समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. मेधा कुलकर्णी यांचे पती विश्राम हे व्यावसायिक आहेत. M.K. Associattes असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. त्यांची कंपनी अॅल्युमिनियम या व्यवसायाशी निगडीत आहे. 2019 च्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कापण्यात आला होता. पण त्यानंतरही त्यांनी प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडली आहे. त्याचीच दखल घेत मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.