Rajya Sabha Election Candidate Net Worth: राज्यसभेच्या सहा जागांसाठी बिनविरोध निवडणूक होत आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे. एक अपक्षासह सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री चंदक्रांत हंडोरे यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवाराच्या अर्जाचे शुक्रवारी पडताळणी होणार आहे. त्यानंतर राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली, याची घोषणा करण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवायच्या सहा सदस्यांसाठी निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपचे तीन, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे एक आणि काँग्रेसचा 1 उमेदवार असे एकूण सहा जण राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. भाजपने चौथा उमेदवार न उतरवल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी अलीकडेच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना लगेचच राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 


गुरुवारी सहा राज्यसभेच्या जागांसाठी एकूण ७ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या सातही उमेदवारांमध्ये सर्वाधिक संपत्ती प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे एकूण 450 कोटींची चल-अचल संपत्ती आहे. तर, मिलिंद देवरा यांच्याकडे 134 कोटी व अशोक चव्हाण यांच्याकडे 68 कोटींची संपत्ती आहे. काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांच्याकडे 2.6 कोटी, मेधा कुलकर्णी यांच्याकडे 5 कोटी कर अजीत गोपछडे यांच्याकडे 11.7 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. 


भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे उमेदवार अर्ज भरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. तर, काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे हे उमेदवारी अर्ज भरत असताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे अजय चौधरीसोबत होते. 


राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे कारण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाकडेही उमेदरवाराला राज्यसभेवर पाठवण्यासाठीचे पुरेसे संख्याबळ आहे. तर, अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. पण त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला जाण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसून अर्जावर आमदारांची स्वाक्षरीदेखील नाहीये. 


प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी


राज्यसभा सदस्य असतानाही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मे 2027पर्यंत त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ आहे. तरीदेखील त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळं पटेल यांना उमेदवारी देत आहोत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले होते.