राज्यसभेची पुन्हा हुलकावणी, पंकजा मुंडे आता काय भूमिका घेणार?
Rajyasabha Election 2024 : काँग्रेससोडून भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना अवघ्या 24 तासात राज्यसभेची लॉटरी लागली. भाजपाकडून महाराष्ट्रातील तीन नेत्यांची नावं राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. पण यात पु्न्हा एकदा पंकजा मुंडे यांना हुलकावणी मिळाली आहे. आता पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे समर्थकांचं लक्ष लागलं आहे.
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला. त्यानंतर विधान परिषद किंवा राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) आली की पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होते. यावेळी देखील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजकडून (BJP) पंकजा मुंडे तिकिट मिळणार अशी चर्चा झाली. पण यावेळीदेखील ही चर्चा केवळ चर्चा ठरली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या अगोदर राज्यसभेची ही शेवटची निवडणूक होत आहे त्यामुळे राज्यसभेवर पंकजा मुंडे जातील असा विश्वास राज्यभरातील कार्यकर्त्यांना होता. मात्र पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही.
प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतं. पण पुढे त्यांचं नाव वगळलं जातं. पंकजा मुंडे यांनी आपलं नाव चर्चेत कसं येतं याबाबत प्रश्न विचारला होता. दोन दिवसापूर्वी पंकजा मुंडे बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी आपल्यासोबत दगाफटका झाल्याचं त्यांनी जाहीर भाषणामध्ये बोलून दाखवलं होतं. त्याचबरोबर प्रत्येक वेळी आपल्या नावाची चर्चा होते. आता मला मतदार संघ देखील उरला नाही त्यामुळे अशा चर्चा होत असतील असं देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आपण कुठलीही दावेदारी किंवा उमेदवारी मागितली नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट देखील झाली होती. या भेटीत नेमकं काय घडलं हे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट का झाली होती हे गुलदस्तातच ठेवलं. दुसरीकडे पंकजा मुंडे यांचे समर्थक तसंच पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा नाराजीचा कारण ही तसंच आहे. कारण पंकजा मुंडे यांना पराभवानंतर विधानपरिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्यात येईल असं समर्थकांना वाटत होतं. मात्र पंकजा मुंडे यांना कुठलीही संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता पक्ष पंकजा मुंडेंना केव्हा संधी देणार याकडे मुंडे समर्थकांचं लक्ष लागलंय
पंकजा मुंडे नेमकं काय करणार?
गेल्या दीड वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. शिंदे हे शिवसेनेसह भाजपसोबत आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार देखील भाजपशी हातमिळवणी करुन सत्तेत आले. त्यामुळे मोठे बदल महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत अनेकांना आता एकमेकांसोबत प्रतिस्पर्धी करावी लागणार आहे. परळी इथील मतदार संघांमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघे आमने-सामने असायचे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात ही जागा नेमकी कुणाला मिळणार हे कोडं आहे. पंकजा मुंडे यांनी देखील आपल्याला मतदारसंघच राहिला नाही असं सूचक व्यक्त केलं. त्यामुळे समर्थकांची नाराजी वेळोवेळी पाहायला मिळाली आहे. पक्ष आता पंकजा मुंडे यांना कुठली जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
पंकजा मुंडे मार्ग बदलणार का?
आपण भाजपातच राहणार असं पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी सांगितलं. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये कुठलीही संधी पंकजा मुंडेंना दिली गेली नाही असं समर्थक उघडपणे बोलून दाखवतात. उलट कारखान्यावरती धाडी आणि त्याचबरोबर कुठलीही मदत मिळत नसल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज असल्याचा पाहायला मिळालं. पंकजा मुंडे यांनी अनेक वेळा मनातील खदखद बोलून दाखवली. मात्र काही दिवसापूर्वी परळी झालेल्या कार्यक्रमानंतर सगळं अलबेला असल्याचं नेते आणि पंकजा मुंडे यांच्याकडून दर्शवण्यात आलं असलं असलं तरी शेवटच्या या राज्यसभेच्या दावेदारीमध्ये पंकजा मुंडे पुन्हा एकदा मागे पडल्या आहेत. आता विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत यामध्ये काय समीकरण होतात आणि त्यामध्ये पंकजा मुंडे यांची भूमिका काय आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे नवीन काही पाऊल उचलणार का याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे