राकेश पाटील यांची हत्या : चार जणांना पोलीस कोठडी, मुख्य सूत्रधार फरार
अंबरनाथमधील मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाणे : अंबरनाथमधील मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डी मोहन हा मात्र अजूनही फरार आहे.
जैनम रेसिडेन्सी परिसरात राकेश पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच मुरबाडमधून चार आरोपींना नाका-बंदी दरम्यान अटक केली. विनायक हरी पिल्ले, विजय राजेश्वर दासी, राजू चिन्नम्मा दासी आणि अख्तार अनिस खान अशी या आरोपी यांची नावे आहेत.
राकेश पाटील हे संध्याकाळी रिलायन्स रेसिडेन्सी भागातील पटेल आर मार्टजवळ उभे होते. चार हल्लेखोरांनी त्यांना खाली पाडत तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चार संशयितांना जणांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता आहे.
राकेश पाटील हे संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान रिलायन्स रेसिडेन्सी भागातील पटेल आर मार्टजवळ उभे असताना हल्ला करण्यात आला होता. यामध्ये पोटात आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने राकेश गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तिथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.