प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : जगातील सर्वात मोठ्या प्रस्तावित पेट्रोकेमिकल ग्रीन रिफायनरी विरोधात  राजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. स्थानिक प्रकल्पग्रस्तांसह हजारो मच्छिमार या मोर्चात सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात जगातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणार पंचक्रोशीतल्या चौदा गावातील 13 हजार 600 एकरवर ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभा राहणार आहे. सुरुवातीला संघर्ष समित्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला स्थानिकांनी मोठा विरोध, आंदोलनही केलं. मात्र प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांनी नियोजीत प्रकल्पाच्या बदल्यात काही मागण्या आणि मुद्दे सरकारसमोर ठेवले होते.  त्याला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे रिफायनरीचा विरोध थंडावल्याचे चित्र निर्माण झाले होते. 


मात्र या पंचक्रोशीतील मच्छिमारांनी या प्रकल्पाविरोधात स्वतंत्र लढा उभारण्याचं ठरवलं. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आलं. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतलीय.