राम गणेश गडकरींचा पुतळा कधी बसवणार? याकडे सर्वांचं लक्ष
पुण्यातील संभाजी बागेत गडकरींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना कधी होणार हा प्रश्नदेखील चर्चेत आलाय.
पुणे : प्रसिद्ध नाटककार, भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची स्मृतीशताब्दी आजपासून सुरु होत आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पण त्याच वेळी पुण्यातील संभाजी बागेत गडकरींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना कधी होणार हा प्रश्नदेखील चर्चेत आलाय.
हा पुतळा उखडून टाकला होता
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी ३ जानेवारी २०१७ ला हा पुतळा उखडून टाकला होता. त्याविरोधात साहित्य तसेच कला क्षेत्रातून संताप व्यक्त केला होता. आंदोलनही केलं गेलं होतं. त्यानंतर पुण्यात भाजपची सत्ता आल्यास गडकरींचा पुतळा संभाजी बागेत पुन्हा बसवण्यात येईल, असं आश्वासन भाजप नेत्यांनी दिलं होतं.
पुतळा पुन्हा बसवण्यावर प्रस्ताव मंजूर
इतकंच नाही तर महापालिकेत सत्ता आल्यानंतर तसा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. असं असताना गडकरींचा पुतळा अजून तरी संभाजी बागेत बसवण्यात आलेला नाही. तसंच या ठिकाणी आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे.