सातारा: समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते बुधवारी साताऱ्याच्या पडळ येथील साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा कुणी नीट अभ्यास केला तर त्यांना हे ज्ञात होईल की छत्रपती यांची उपाधी 'शिवछत्रपती' ही होती, 'जाणता राजा' अशी कधीच नव्हती. 'जाणता राजा' हा शब्द प्रयोग रामदासांनी वापरला. तसेच रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. त्यांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या. शिवरायांचे व्यक्तिमत्त्व जिजाऊंनीच घडवले, असे शरद पवार यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, राऊतांचा उदयनराजेंना टोला


यावेळी शरद पवार यांनी 'जाणता राजा' या उपाधीवरून उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. 'मला 'जाणता राजा' म्हणा असे मी कुठेही, कोणालाही म्हटलेले नाही. साताऱ्याच्या कुणी काही म्हणो, पण मला त्यावर काहीही बोलायचे नाही. त्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर पुरेसे आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले. 


दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच आहेत, असे त्यांनी ठासून सांगितले. कारण, शरद पवार यांना संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा माहिती आहे. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, शेती, औद्योगिक वसाहती, नागरी प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न अशी चौफेर जाण शरद पवार यांना आहे. एवढेच नव्हे तर या प्रत्येक समस्येचे उत्तरही त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच शरद पवार यांना जाणता राजा म्हणतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते.