अमर काणे, झी 24 तास, नागपूर : जुगाड कसा आणि काय करावा याचा काही नेम नाही. याआधी महाराष्ट्रात जुगाड करून कार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता चक्क भंगारातील सामान वापरून रेसिंग कार तयार केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नागपुरातील एका तरुणाने भंगार साहित्याचा वापर करत देशी जुगाड करून रेसिंग कार तयार केली आहे. स्वप्नील चोपकर असं या पठ्ठ्याचं नाव आहे. त्याने या रेसिंग कारची ट्रायलही घेतली. M. com करत असलेल्या स्वप्नीलने  सुमारे 10 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही रेसिंग  कार साकारली.


स्वप्नीलची आई फिजिओथेरपिस्ट आणि वडील बेकरीत चालक म्हणून काम करतात. आर्थिक परिस्थिती साधारण असली तरी त्याला बालपणापासूनच कार चालवण्याची खूप इच्छा होती. असं म्हणतात की इच्छा असेल तर मार्ग दिसेल. त्याची प्रचिती या तरुणाकडे पाहून येते.याच इच्छेतून ही भंगार सामान गोळा करून त्याने रेसिंग कार तयार केली आहे. 


कॉमर्स क्षेत्रात शिक्षण घेत असतानाही गॅरेजमध्ये काम करणे सुरू केलं. त्यानंतर लॉकडाउनच्या काळात त्याने रेसिंग कार बनवण्यास सुरुवात केली. पहिल्या दोन प्रयत्नात तो अपयशी ठरला. मात्र हार मानून सोडून दिलं नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात मात्र तो यशस्वी ठरला. 


तिसऱ्या प्रयत्नात टाकाऊ आणि भंगारातील वस्तूंचा वापर करून रेसिंग साकारली. 800 सीसीचे इंजिन, स्टेरिंग, पॅनेल  भंगारातून इतर वस्तू वणवण शोध घेत जमवून त्याने ही कार साकारली. मात्र महत्त्वाचं म्हणजे रेसिंग कार तयार करताना भारतीय रस्त्यांवर ही कार घेऊन चालवता येईल याची कटाक्षाने त्यांनी काळजी घेतली. 


कारला सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा खर्च आला. एक लिटर पेट्रोलमध्ये 16 ते 17 किमी धावते. सध्या पहिल्या दोन गियर मध्ये ही कार 90 किमी वेगाने धावल्याचा दावा स्वप्नीलने केला आहे. आरटीओ मध्ये जाऊन ही कार आता  रस्त्यांवर धावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी स्वप्निल प्रयत्न करणार आहे. 


स्वप्निलने या कारसाठी पैसे जमा करताना रस्त्यावर पत्रके वाटली, कार वॉशिंग चे काम केले,कॅटरींगचे काम केले आणि कार करतात आवश्यक पैसे जमवले.