Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. सर्वपक्षीय नेते राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सभा घेत आहेत. कुठे मतदारांच्या गाठीभेटी सुरु आहे, तर कुठे नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. अशातच भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या एका कृतीमुळे विरोधकांनीही त्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडीओमध्ये नेते दानवे यांच्या लाथ कार्यकर्त्याला लाथ मारताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठका आणि कार्यकर्ते मेळाव्यांत जोमानं सहभाग घेणाऱ्या कार्यकर्त्याला दानवेंनी लाथ मारलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, अर्जुन खोतकर आणि दानवे यांची भोकरदनमध्ये भेट झाली. त्यावेळी शेख अहमद हे कार्यकर्ते बाजूलाच उभे होते. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी त्यांना लाथ मारलीय.  दानवे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. तर शेख अहमद यांनी रावसाहेब दानवेंनी मस्करीमध्ये हे कृत्य केल्याचा दावा केलाय. तसंच विरोधकांकडून नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोपही अहमद यांनी केला. 


तर दानवेंच्या या व्हिडीओवर विरोधकांनी टीकेची झोड उठवलीय. कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करणं योग्य नाही. भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसेल तर पुन्हा कार्यकर्त्यांनी भाजपला निवडून द्यायचं की नाही याचा विचार करायला हवा असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलंय. 


दानवे आपल्या वक्तव्यानं नेहमीच चर्चेत असतात. घरी येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नका असे त्यांनी निवडणुकीच्या काळात वक्तव्य केल्यानं रावसाहेब दानवे यांच्याविरोधात 2016 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. यापूर्वी शेतकऱ्यांना साले म्हटल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. तेव्हा त्यांनी 'साले' हा शब्द मराठवाड्यात शिवी नसल्याची सारवासारव केली होती.