मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : खामगाव शहरालगत असलेल्या  घाटपुरीमधील मानसिकरित्या कमजोर असलेल्या १६ वर्षीय बालिकेवर तेथीलच दोघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैद्राबाद येथील अत्याचार प्रकरण आणि बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे एका ५५ महिलेवर अत्याचार आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री गतिमंद मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले. ही मुलगी मंगळवारी संध्याकाळी काही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी गावातीलच एकाने तिने गाठले.  


आमीष देऊन निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारानेही तिच्यावर निर्जनस्थळी आणि परिसरातील एका झोपडीत अत्याचार केला. बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी न परतल्याने घरातील मंडळींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. 



आरोपींनी पीडित बालिकेला आम्ही तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष ही दिल्याचे समजते. दरम्यान तिने सर्व हकीकत सांगितल्यावर घरातील मंडळींनी तिला सोबत घेत पोलीस स्टेशन गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून शोध मोहिम राबवून दोन आरोपींना अटक केली आणि दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ज्ञानेश्वर तायडे आणि दत्ता साठे अशी आरोपींची नावे आहे.


आरोपी विरोधात भादंवी ३७६(डी), ३७६(२),(आय), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम -५ (ग), ५ (क) आणि कलम ६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.