योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना रंगेहात अटक करण्यात आली (Nashik Crime News). यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. अँटीकरप्शन ब्युरोने धनगर यांच्या घरातून 85 लाखांची रोकड आणि 32 तोळं सोनं जप्त केले. तर, काही मालमत्तांची कागदपत्रेही सापडली होती. अँटीकरप्शन ब्युरोने सुनिता धनगर यांना अटक करत त्यांची कसून चौकशी केली. चौकशीत  कोट्यवधींची माया जमवणाऱ्या सुनिता धनगर यांचे रेट कार्डच तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. हे लाचखोरीचे रेड कार्ड पाहून तपास अधिकारीही चक्रावले आहेत. 


सुनीता धरगर यांच्याकडे डोळी दिपवणारी श्रीमंती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महापालिकेतील शिक्षण मंडळाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, 50 हजारांची लाच घेताना लाचलुचपत खात्यानं त्यांना रंगेहात अटक केलीय. धनगर बाईंची आणखी चौकशी केली असता लाचलुचपत विभागाच्या हाती घबाडच लागलं. त्यांच्याजवळ 85 लाखांची रोकड, 35 तोळे सोनं आणि बँकेच साडेबारा लाखांची रक्कम सापडली. इतकच नाही तर नाशिक शहरात एक प्लॉट, दोन फ्लॅट आणि दीड कोटींचं राहतं घर अशी डोळी दिपवणारी श्रीमंतीही समोर आली. 


महापालिका शाळांमधील तीन शिक्षकांच्या मदतीनं वसुली


सर्व कामांसाठी पायी फिरणा-या या शिक्षणाधिका-याबद्दल अनेक गोष्टी समोर आल्यायेत. काळी माया जमवण्यासाठी त्यांनी महापालिका शाळांमधील तीन शिक्षकांच्या मदतीनं वसुली सुरू केली होती. नाशिक शहरातील मोठमोठे अधिकारी एसीबीच्या रडारवर आल्यानंत धनगर बाईंनी स्वेच्छानिवृत्तीची तयारी सुरू केली. मात्र कर्माचे भोगही इथेच भोगायचे असतात. अखेर कायद्याचे हात सुनीता धनगरपर्यंत पोहचले आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला.  


सुनीता धनगर यांच्या लाचखोरीचं रेट कार्ड


  • पोलिस तपासात सुनीता धनगर यांच्या लाचखोरीचं अजब गजब रेटकार्ड समोर आले आहे. 

  • मुख्याध्यापकांची पदोन्नती करायची असेल तर 40 ते 50 हजार रुपये

  • खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांना मान्यता देण्यासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये

  • शालार्थ आयडी हवा असेल तर 50 हजार रुपये

  • शिक्षकांची बदली करायची असेल तर 40 हजार रुपये

  • शिक्षकांचा सी आर म्हणजे गोपनीय वार्षिक अहवालासाठी प्रत्येकी 1500 रुपये

  • अनधिकृत शाळांवरील कारवाई मागे घेण्यासाठी 50 हजार ते 1 लाख रूपये

  • वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी 2 टक्के

  • इतकच नाही तर रजा मंजुरी हवी असेल तर त्यासाठीसुद्धा 500 ते 1000 रुपये घेतले जायचे. 


भ्रष्ट अधिका-यांवर थातुर मातुर कारवाई


 यापूर्वी देखील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्या कोकण मंडळात रुजू झाल्या आहेत. झनकरांनंतर आता सुनीता धनकरांची काळी माया समोर आलीय. थातुर मातुर कारवाई पलिकडे या सरकारी चोरांवर व्यवस्था कोणतीच ठोस कारवाई करणार नसल्याचं वारंवार समोर आल्यामुळेच या भ्रष्ट अधिका-यांची भीड चेपली जात नाही.