खडसे यांनी उघड केला धान्य गोदामांमधील गोलमाल
रेशनच्या धान्य गोदामांमध्ये कशी अफरातफर होते, याचं पितळ माजी महसूलमंत्री आणि भाजप आमदार एकनाथ खडसे यांनी उघड केले आहे. या प्रकारानंतर भुसावळच्या शासकीय गोदामाला सील ठोकण्यात आले आहे.
जळगाव : रेशनच्या धान्य गोदामांमध्ये कशी अफरातफर होते, याचं पितळ माजी महसूलमंत्री आणि भाजप आमदार एकनाथ खडसे यांनी उघड केले आहे. या प्रकारानंतर भुसावळच्या शासकीय गोदामाला सील ठोकण्यात आले आहे.
आणि खडसे यांनी धाड टाकली
जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या शासकीय गोदामात धाड घालून खडसेंनी तिथं कसा गोलमाल चालतो, हे पुढं आणलं. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामात पन्नास किलोच्या धान्याच्या गोणीत दहा ते बारा किलो धान्य चोरी होत असल्याची धक्कादायक बाब यावेळी समोर आली.
खडसेंची कारवाईची मागणी
यावेळी खडसेंसोबत भाजपचे आमदार संजय सावकारे देखील उपस्थित होते. या प्रकारानंतर खडसेंनी थेट नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्याचे सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून याप्रकरणी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर आणि इतरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
खडसे यांचा गंभीर आरोप
भुसावळ, चाळीसगाव तसंच अंमळनेर परिसरातून रेशन मालात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्याने खडसे यांनी हे पाऊल उचलले. शासकीय अधिकारी, पुरवठादार आणि वाहतुकदारांचं साटंलोट असून हप्ते घेऊन काळ्या बाजाराची प्रकरणं दाबली जात असल्याचा आरोप खडसेंनी यावेळी केला. या प्रकारानंतर भुसावळच्या शासकीय गोदामाला सील ठोकण्यात आले आहे.