प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा लपंडाव सुरू असून आजही परिस्थिती कायम आहे. एकीकडे मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी आकाश निरभ्र तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सकाळपासून पावसाचा पत्ता नसला तरी दुसरीकडे समुद्रकिनारी सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला मोठं उधाण आलं असून उधाणामुळे लाटांनी रौद्र रुप धारण केलं आहे. जवळपास साडे चार मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळत आहेत. या अजस्त्र लाटा थेट किनाऱ्यावर धडकत असून  किनारपट्टीला त्याचा फटका बसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ठिकाणी नव्याने तयार केलेला रस्ता देखील या अजस्त्र लाटांनी वाहून गेला आहे. तसेच या लाटांचे पाणी किनारपट्टी भागातील घरात शिरतंय. या लाटांनी बंधाऱ्यासाठी वापरण्यात आलेले टेट्रापॉडही लाटांच्या माऱ्यामुळे समुद्रात वाहून गेले आहेत. भरतीचे पाणी सखल भागात जात असून काही नागरी वस्तीत देखील पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी मिऱ्या बंधाऱ्यावर साडे चार मीटर उंचीच्या लाटा येत असून गुहागरच्या वेळणेश्वर आणि दापोलीच्या हर्णे, पाज पांढरी भागात देखील हीच परिस्थिती पहावयास मिळतेय तसेच जिल्हा प्रशासनाने किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा दिलाय.



दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 66 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मंडणगड आणि खेड तालुक्यांमध्ये सरासरी 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पावसाने ओढ न देता बरसत राहावं अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.