प्रणव पोळेकर, झी २४ तास, रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांनी अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मोहीमच उघडलीय. याच मोहिमेचा भाग म्हणून तब्बल ५० लाख रुपयांचे कोकेन आणि तीन आरोपींना अटकही करण्यात आलीय. रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसीच्या याच पडक्या इमारतीत कोकेन विक्रीचा धंदा सुरू होता. मात्र रत्नागिरी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून ९३६ ग्राम कोकेन जप्त केले आणि तीन आरोपींना अटकही केली. या आरोपींमध्ये एक तटरक्षक दलाचा अधिकारी आणि दुसरा कर्मचारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती, रत्नागिरी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी जप्त केलेली पावडर ही कोकेनच असल्याचं स्पष्ट झालंय. याप्रकरणी दिनेश शुभे सिंह, सुनील कुमार नरेन्द्र कुमार रनवा आणि रामचंद्र तुलिचंद मलिक या तिघांना अटक करण्यात आलीय. या तिघांपैकी दिनेश आणि रामचंद्र हे दोघे कोस्टगार्डचे कर्मचारी आहेत. 


या तिघांनाही आता २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे रत्नागिरीत तरुण पीढी वाया जातेय. अंमली पदार्थांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी मोहीम राबवलीय. मात्र तटरक्षक दलाचे कर्मचारी पोलिसांच्या मोहिमेला हरताळ फासताना दिसत आहेत.