MIDC केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू
धक्कादायक घटना लोटे एमआयडिसीतील घरडा केमिकल कंपनीमध्ये घडली आहे.
रत्नागिरी: केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानं रत्नागिरी हादरल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक घटना लोटे एमआयडिसीतील घरडा केमिकल कंपनीमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 7 नंबरच्या प्लांटमध्ये हा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली आणि परिसरात धुराटे लोट पसरले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.
7 नंबरच्या प्लांटमध्ये लागलेल्या आगीमध्ये काही कामगार भाजल्याची माहिती मिळाली आहे. तर तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या कामगारांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
केमिकल कंपनीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढलं जात आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत स्फोट झाला होता आणि त्यानंतर आता घरडा केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे.