पत्नीला जाळलं, राख समुद्रात टाकली... रत्नागिरी हादरली
पतीने गाठली क्रौर्याची सीमा... हत्येची पद्धत वाचून अंगावर येईल काटा...
रत्नागिरी : रत्नागिरीत (Ratnagiri) घडलेल्या एका घटनेने महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. रत्नागिरी पंचाय समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत (Swapnali Sawant) यांची जाळून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून स्वप्नाली सावंत यांच्या पतीचा यात समावेश आहे.
राजकीय नेता असलेल्या सुकांत उर्फ भाई सावंत असं आरोपीचं नाव असून त्याने स्वप्नाली सावंत यांना पेट्रोल टाकून जीवंत जाळलं. धक्कादायक म्हणजे स्वप्नाली सावंत यांना जाळल्यानंतर त्यांची राख समुद्रात टाकली. हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी सुकांत यांनी नियोजित कट रचला होता.
पोलिसांनी सुकांतबरोबरच त्याचे दोन साथीदार रुपेश उर्फ छोटा सावंत आणि प्रमोद यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या न्यायालयाने तिन्ही आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
1 सप्टेंबरपासून स्वप्नाली बेपत्ता
1 सप्टेंबरपासून स्वप्नाली सावंत मिऱ्या इथल्या घरातून बेपत्ता होत्या. विशेष म्हणजे स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत यानेच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रत्नागरी पोलिसांनी 8 दिवस कसून तपास करत हत्येचा उलगडा केला. पोलिसांनी याप्रकरणी डॉग स्कॉडचीही मदत घेतली. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारल्यानंतर त्यांची राख समुद्रात टाकली. त्यामुळे कोणताही पुरावा नव्हता. पण पोलिसांनी कसून तपास करत आरोपींना अटक केली.
हत्येमागचं कारण काय?
स्वप्नाली सावंत आणि सुकांत सावंत यांचं फारसं पटत नव्हतं. त्यांच्यात अनेकदा वाद होत होते, अशी माहिती पुढे आली आहे. पण या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
35 वर्षीय मृत स्वप्नाली या रत्नागिरी पंचायत समितीचा माजी सभापतीही होता.जिल्ह्याचे एसपी मोहित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीच्या रात्री तिन्ही आरोपींनी आधी स्वप्नाली यांच्यावर पेट्रोल ओतलं आणि नंतर तिला पेटवून दिलं.