प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : लांजा तालुक्यातील साटवली मार्गावरील बापेरे फाटा नजदीक एका झाडीमध्ये जळालेल्या अवस्थेत अज्ञात मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळखळ उडाली आहे. घातपात केल्याचाच प्रथमदर्शनी संशय पोलिसांनी  व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने लांजा पोलिसांनी तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवली आहेत. जळालेला मृतदेह महिलेचा असून मुलगा मजहर यालाच संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याच्या बोलण्यात विसंगती आढळून येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. मात्र तपासाअंती हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साटवली येथील एक वृद्ध महिला दोन दिवस बेपत्ता होती. मात्र हा मृतदेह तिचाच आहे का ? याचा तपास केला जात आहे. आढळलेल्या मृतदेहातील व्यक्तीला प्रथम ठार मारुन त्यानंतर जाळण्यात आले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साटवली येथील फातिमा हमीद काळसेकर (वय ६१) या आपला मुलगा मजहर याच्यासोबत मोटरसायकलने मंगळवारी दुपारी ३ वाजता आठवडा बाजारासाठी लांजा येथे आल्या होत्या. मात्र घरी परतीच्यावेळी पाऊस असल्याने आपण मोटारसायकलने न येता शेवटच्या एसटी बसने येऊ असे सांगून तिने मजहरला पुढे जाण्यास सांगितले. असे मजहरने आपल्या वडिलांना सांगितले. मात्र शेवटची गाडी साटवली येथे आली असता आई घरी न परतल्याचे त्याने वडील हमीद उमर काळसेकर यांना सांगितले. 



लगेचच वडीलांनी लांजा येथे असणारा दुसरा मुलगा मोहसीन काळसेकर याला फोन करून लांजाकडे गेलेल्या आपल्या पत्नीची विचारपूस केली. मात्र आई आपल्याकडे आलीच नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर वडिल हमीद आणि मोहसीन या दोघांनी आईला शोधण्यासाठी संपूर्ण लांजा बाजारपेठ पिंजून काढली. मात्र आई फातिमा हीचा कुठेच शोध लागला नाही. त्यानंतर आई सापडत नसल्याची तक्रार देण्यासाठी बुधवारी दोघेही लांजा पोलीस स्थानकात गेले. मात्र प्रथम आजुबाजुला,नातेवाईकांकडे चौकशी करा आणि माहिती न मिळाल्यास तक्रार द्या असे पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे शोधाशोध करुनही पत्नी कुठेच न सापडल्याने पती हमीद यांनी बुधवारी पत्नी फातिमा या हरवल्याची पोलिसांत खबर दिली. 



गुरुवारी आईचा शोध घेण्यासाठी मोहसीन व त्याचा मोठा भाऊ मोटारसायकल घेऊन साठवली रोडवरून जात असताना लघुशंका करण्यासाठी गोळवशी-बापेरे डंग येथे थांबले. तेव्हा रस्त्याच्या कडेला माहसिन याला काहीतरी जळाल्यासारखे काहितरी दिसले. त्याने पुढे जाऊन पाहिले असता एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याचे त्याला आढळून आले. याबाबत त्याने तातडीने लांजा पोलीस स्थानकात जाऊन माहिती दिली. त्याक्षणी लांजा पोलिस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, श्रीकांत जाधव, दिलीप पवार, तृप्ती सावंत-देसाई, नितीन पवार, आर, जे, वळवी, चालक राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली. घटना स्थळाचा पंचनामा करुन अधिक तपास सुरू केला आहे. यामध्ये आई फातिमाला लांजा येथे घेऊन आलेला मुलगा मजहर याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 


दरम्यान याच ठिकाणी एक खळबळजनक घटना समोर आली. खूनानंतर भाताच्या पेंड्याने जाळण्यात आलेला मृतदेह या ठिकाणी आढळला. मृतदेह पुर्णपणे विदृप झाला असून फक्त एका हाताची बोटे दिसत होती. रस्त्याच्या कडेला आठ ते दहा फुटांवर छोट्या झाडींमध्ये जळालेला मृतदेह आढळला. मृतदेहावर जाळण्यासाठी भाताचा पेंढा आणि छोटी फांदी टाकलेली होती. जाळण्यासाठी रॉकेल किवा पेट्रोलचा वापर करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.


मृतदेह कोणाचा आहे ? याचाही अद्यापही उलघडा झाला नव्हता मात्र फातिमा काळसेकर बेपत्ता असल्याने हा मृतदेह त्यांचा आहे का याची तपासणी सुरू झाली. मृतदेहाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी फिरते वैद्यकिय तपासणी पथक बोलविण्यात आले होते. तपासाची चक्रे आणि मृतदेह तपासणी अहवाल आल्यावर मृतदेह फातिमा हमीद काळसेकरचा असल्याचे स्पष्ट झाले.


ही घटना उघडकीस येताच आजूबाजूचा परिसर हादरुन गेला आहे. मृत फातिमा काळसेकर हीचा मुलगा मझर काळसेकर हाच गुन्हेगार असल्याचे तपासाअंती निदर्शनास आले आहे. कर्जामुळे आपण आईचा खून केला, दागिने काढून घेतले आणि मृतदेह जाळल्याचे आरोपी मुलगा मझर याने पोलिसांकडे कबूल केले. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे,डी .वाय. येस. पी. बाजीराव पाटील ,पी. आई. गिरीश सहासने यांनी तपास करून आरोपीला गजाआड केले.