प्रणव पोळेकर, झी २४ तास, रत्नागिरी : ते दोघे एकमेकांचे शत्रू. एकाची पकडण्याची धडपड. तर दुसऱ्याचा वाचण्यासाठी आटापिटा. मात्र असं काही घडलं की शिकारी आणि शिकार दोघेही गपगुमान एकत्र राहिले. तेही काही तास. काय आहे हा नेमका प्रकार काय झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता. त्याने अशोक कांबळे यांच्या घराजवळच्या कुत्र्यावर झडप घातली. पण यातून कुत्रा कसाबसा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या घराजवळच्या शौचालयात घुसला. कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील त्या शौचालयात शिरला. नेमक्या त्याच वेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्यानं दोघेही आत अडकले. सकाळी कांबळे यांनी शौचालयाचा दरवाडा उघडला आणि समोर बिबट्या आणि कुत्र्याला पाहून त्यांची पाचावर धारण बसली. तातडीनं दरवाजा बंद करुन अशोक कांबळेंनी वनविभागाला संपर्क साधला. 


वन विभाग तातडीने पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहचलं. त्यांनी शौचालयाचा वरचा भाग फळ्या ठोकून बंद केला आणि शौचालयाच्या तोंडावर पिंजरा लावून ठेवला. आता आतमध्ये भेदरलेला कुत्रा आणि अडकून पडलेला बिबट्या होता. नेमका कुत्रा शौचालयाच्या दरवाज्याजवळ होता. पिंजरा लावला गेला तेव्हा सुदैवानं कुत्रा पिंजऱ्यात शिरला नाही. 


मात्र जसा दरवाजा पूर्ण उघडला गेला तसा, बिबट्या झटकन पिंजऱ्यात शिरला. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. जेरबंद करण्यात आलेला मादी बिबट्या चार वर्षांचा आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तेच खरं.