रत्नाकर गुट्टेंचा आणखी एक कारनामा, शेतकऱ्यांना कर्जाच्या बॅंक नोटीसा
गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडचे चेअरमेन रत्नाकर गुट्टे यांचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे.
गजानन देशमुख, परभणी : गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडचे चेअरमेन रत्नाकर गुट्टे यांचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे. यापूर्वीच त्यांच्या विरोधात शेतकर्यांच्या नावे ३२८ कोटी रुपयांचे बनावट कर्ज उचलल्याचा गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना बँका नव्याने आता आणखी काही शेतकर्यांना कर्ज उचलल्याच्या नोटीसा पाठवीत आहे. यात हिंगोली परभणी, नांदेड, लातूर आणि यवतमाळमधील शेकडो शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे बॅंक नोटीस आल्यानंतर शेतकऱ्यांना हादरा बसला आहे. कर्ज न घेता नोटीस कशी आली, याचीच चर्चा या जिल्ह्यांत होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढल्याचे उघड होत आहे.
रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीची तक्रार
यवतमाळ जिल्ह्यातील गौळ बुद्रुकच्या शेतकऱ्याला परभणीच्या सिंडिकेट बँकेने बजावलेली नोटीस बजावली आहे. १७ मार्च २०१६ रोजी या शेतकऱ्याने ८३ हजार ३०० रुपयांचे कर्ज उचलल्याचे या नोटीसमध्ये स्पष्ट दाखवण्यात आले आहे. ही रक्कम दोन वर्षांनंतर व्याजासह १ लाख ८ हजार ८०३ रुपये एवढी झाली आहे. शिवाय या नोटीशीचा हजार रुपयाचा खर्चही शेतकऱ्यालाच भरायचा आहे.
विदर्भातल्या बाळासाहेब देशमुखांनाही व्याजासह १ लाख ९ हजार ८०३ रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख चक्रावून गेलेत. अडीच हजार रुपये प्रती टन भाव द्यायचे आमिष दाखवून गंगाखेड शुगर्सने बाळासाहेब देशमुखांचा ४० टन ऊस नेला. त्यांना याबदल्यात अडीच हजार प्रति टन भाव देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र अडीच हजार सोडाच, कारखान्याने त्यांच्या नावे कर्ज उचलल्याने ते चक्राऊन गेलेत. हा काय प्रकार आहे, हे मलाच समजेलेले नाही. ही नोटीस पाहून आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया शेतकरी बाळासाहेब देशमुख यांनी दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबरच असाच प्रकार घडला असून परभणी हिंगोली नांदेड, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबतही घडला. शेतकऱ्यांनी कुठलीही कागदपत्रे दिलेली नसताना लाखो रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर काढण्यात आली आहेत. त्यामुळे दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याबाबत बँक अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही.
शेतकऱ्यांच्या नावे बनावट कर्ज उचलल्याच्या आरोपाखाली गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळावर फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शेतकऱ्यांच्या नावे बनावट कर्जाचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गुट्टेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत झी २४ तासच्या प्रतिनिधीने गुट्टेंशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. एसएमएसलाही त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलणाऱ्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.