जयेश जगड, झी मीडिया, अकोला: देशभरात आज रावणाचं दहन केलं जाते याला आता काहीसा विरोध ही होत आहेय.मात्र अकोला जिल्ह्यातील सांगोळा या गावात रावणाची पूजा वर्षभर केली जाते. रावणाची पूजा हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकते. पण हो हे अगदी खरं आहे. अकोला जिल्ह्यातीलपातुर तालुक्यातील सांगोळा हे रावणाला पुजणारे गाव आहे. सांगोळा हे गाव अकोल्या हून 40 कि.मी.च्या अंतरावर आहे.एका दगडात कारलेल्या सर्व आयुधानसह या रावणाच्या मूर्तीने या गावाला ओळख मिळवून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावणाचे नाव घेताच 10 तोंड ,20 हात असलेली कपटी, व्यभिचारी,अहंकारी व्यक्ती ची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनसाठी रावणाची प्रतिमा उभारली जाते. पण या गावात दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते.


रावणाच्या अंगी जसे दुर्गुण होते तसे सदगुणही होते..त्यामुळे रावणाकडे तिरस्कार वूत्तीने न पाहता त्यातील वाईट सोडून चांगले गुण प्राप्त करावे, असे या गावात रावण पूजे मागचे कारण गावकरी सांगतात. रावणातील चांगले गुण स्वीकारून त्याची पूजा करण्याचे कार्य येथील ग्रामस्थ परंपरेनुसार करत आहेत. 


रावणाची सासुरवाडी भारतामध्ये


मंदसौरमधील खानपुरा येथे रावणाचा भव्य पुतळा आहे. या ठिकाणी शेकडो वर्षांपासून रावणाची पूजा करण्याची परंपरा आहे. येथील नामदेव समाज लंका नरेश रावणाची पत्नी मंदोदरीला आपली बहीण मानतो. त्यामुळेच या ठिकाणी रावणाला जावयाप्रमाणे मानसन्मान दिला जातो. दसऱ्याच्या काही आठवडे आधीपासूनच खानपुरा येथील नगरपालिकेच्या माध्यमातून रावणाच्या पुतळ्याची साफसफाई करुन त्याची रंगरंगोटी केली जाते. या पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसराचेही शुशोभिकरण केलं जातं. या ठिकाणी स्थानिक प्रशासनच रोषणाई करतं. दसऱ्याच्या दिवशी सकाळी लोक या ठिकाणी रावणाची पूजा करतात. ढोल-ताशांच्या गजरात रावणाची विधीवत पूजा केली जाते. रावणाला दसऱ्यासाठी सासुरवाडीकडून निमंत्रित केलं जातं. या ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जात नाही. तर रावणाचा केवळ वध या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी केला जातो.


नामदेव समाजामध्ये अशी मान्यता आहे की वाईट गोष्टीही नष्ट केल्या पाहिजे. रावण एक महान विद्वान होता आणि त्यामुळेच त्याची पूजा येथील लोक करतात. रावणाला या ठिकाणी जावयाप्रमाणे सन्मान दिला जातो. त्यामुळेच येथील महिला डोक्यावर पदर घेऊनच रावणाच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. केवळ रावणाची पूजा केली जाते असं नाही तर त्याच्या पायामध्ये लाल धागाही बांदला जातो. हा लाल धागा बांधल्याने कोणत्याही असाध्य रोगापासून संरक्षण होतं अशी येथील मान्यता आहे.