कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राज्याचे कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील कलगीतुऱ्यावरून शरद पवार यांनी टायमिंग साधत चांगलाच टोला हाणला आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांची ही प्रतिक्रीया भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी नसेल तरच नवल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात केंद्रीय आणि प्रादेशिक पातळीवर सुरू असलेला भाजपचा झंजावात स्थानिक निवडणुकांमध्येही हिट ठरत आहे. भाजपचा आक्रमक प्रचार आणि त्याला दिलेली कडव्या राष्ट्रवादाची जोड, यांमुळे विरोधी पक्षांपूढे जोरदार आव्हान निर्माण झाले आहे. हे आव्हान परतवून लावायचे तर, राज्याच्या राजकारणात नव्याने मांडणी करावी लागेल याची पवारांना जाण आहे. त्यामुळेच कोल्हापूरात देशातील व राज्यातील राजकीय घडामोडींवर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी खोत आणि शेट्टी यांच्यावर भाष्य करून पश्चिम महाराष्ट्रातील भविष्यातील बदलत्या राजकारणाचे संकेत दिले.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन प्रमुख नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरून बोलताना पवार यांनी थेट राजू शेट्टी यांची बाजू घेतली. पवार म्हणाले, 'लोकसभेमध्ये शेट्टी यांचे काम दिसते. शेतकऱ्यांच्या हितासाठी खोत यांनी काही काम केल्याची मला कल्पना नाही. त्यांनी शेतकरी आंदोलनात लाठय़ाकाठय़ा खाल्ल्याची वा मारहाण झाल्यामुळे इस्पितळात दाखल झाल्याची देखील माहिती नाही'. पवार यांच्या विधानामुळे कोल्हापूरातील आणि सांगली जिल्ह्यातील राजकारणात राजू शेट्टींशी हातमिळवणी करण्याचे संकेत मिळतात. तर, सदाभाऊंना हाताशी धरून शेट्टींचे आणि राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण मोडीत काढण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना धोबिपछाड देण्याचा पवारांचा इरादा स्पष्ट होतो.