नितीन पाटणकर, झी २४ तास, पुणे : अभिनेता अजय देवगनच्या 'दृष्यम' चित्रपटात अजय देवगण पोलीस ठाण्यातच मृतदेह पुरतो. त्याचा शोध लागतो की नाही ठावूक नाही, पण एका पोलीस ठाण्यात खरोखरच १७ वर्षांपूर्वीचा सांगाडा आढळलाय. तोदेखील अगदी व्यवस्थित एका खोक्यात भरून ठेवलेला... आणि हे घडलंय पुण्यामध्ये... कोथरूड पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षाची साफसफाई सुरू असताना एका खोक्यावर 'मानवी सांगाडा' असं लिहिलेलं आढळलं. त्यानंतर पोलीस चक्रावलेच... खोक्यावर फाईल क्रमांकही लिहिला होता. मग सुरू झाला सांगाडा कुणाचा आहे, याचा शोध... त्यात जे समजलं ते धक्कादायक होतं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००२ साली एमआयटी कॉलेजमागे असलेल्या टेकडीवर पोलिसांना एक मृतदेह आढळला होता. अर्धवट जळलेल्या या मृतदेहाची त्यावेळी ओळख पटली नव्हती. २००४ साली याचा प्रथम उलगडा झाला. दुसऱ्याच एका गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी आणखी एक खून केल्याची कबुली दिली. आपल्याच एका नातलगाकडे निखिलनं दोन मित्रांच्या मदतीनं चोरी केली होती. मात्र, पैशांच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाला आणि दोन मित्रांनी निखिलचा खून केला. २००६ साली या खटल्याचा निकाल लागला आणि पुराव्यांआभावी सर्व आरोपी निर्दोष सुटले. 


दरम्यान, पोलिसांनी निखिलच्या आईवडिलांना संपर्क केला. मात्र त्यांनी मृतदेह नेण्यास टाळाटाळ केली. त्यांनी घरही बदललं होतं. या काळात सांगाडा मुद्देमाल कक्षातच होता... खटल्याचा निकाल लागल्यानंतर न्यायालयानं सांगाड्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले... मात्र, नंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि निखिल, तो खोका आणि सांगाडा सगळंच विस्मरणात गेलं...


पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पोलीस स्टेशन आधुनिक करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात मुद्देमाल कक्षाची सफाई होत असताना हा सांगाडा आढळून आला. फाईल तपासल्यानंतर हा सांगाडा निखिल रणपिसेचा असल्याचं उघड झालं. पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या पालकांना संपर्क केला. ते पोलीस ठाण्यात आलेदेखील... मात्र आता त्यांचं वय झालंय... कागदपत्रं, न्यायालयीन कार्यवाही इत्यादी करणं त्यांना शक्य नव्हतं... त्यामुळे त्यांनी पोलिसांना मृतदेहाचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीनुसार करावेत, असं लिहून दिलं. अखेर सोमवारी पोलिसांनी निखिलच्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार केले... मृत्यूनंतरही निखिलच्या नशिबात अवहेलनाच आली... पण १७ वर्षांनी का होईना त्याच्या मृतदेहाला मिळालेली कोठडी संपली आणि पार्थिव पंच महाभूतांमध्ये विलीन झालं.