दिनेश दुखंडे, झी मीडिया, पणजी : मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडीपासून यातना कमी होतात... सावंतवाडी ते बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीत झालेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे प्रशस्त झालेला महामार्ग आकर्षक वाटतो... पुढे महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश केल्यानंतर या महामार्गावर दिलेलं लक्ष अधोरेखित होतं. मुंबई-गोवा महामार्ग गोव्यात सुसह्य वाटतो... कारण इथं राज्यात पर्यटनात योगदान देणारी प्रत्येक गोष्ट जपली जाते... मुंबई-पुणे या सांस्कृतिक शहरांच्या जवळ जाणारा मार्ग असल्यानं गोव्यात महामार्गावर विशेष लक्ष दिलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पत्रादेवी ते पोळयेंपर्यंत असलेल्या ११० किलोमीटर महामार्गावर चौपदरीकरणासाठी १२ हजार कोटींची कामं सध्या सुरु आहेत


- एकूण चार पॅकेजमध्ये काम सुरु आहे


- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीनं 'गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट' यातलं बहुतांश काम करतेय 


- त्यापैंकी मांडवी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पत्रादेवी ते बांबोळी पूलाचं काम यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे


- ६४० मीटर लांबीचा हा पूल भारतातला तिसरा सगळ्यात लांब केबल स्टेड पूल आहे


- तर, जुवारी नदीवर बांधण्यात येत असलेला बांबोळी ते वेरणा पूल डिसेंम्बर २०१९ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे


- मांडवी, जुवारी आणि कोनकोंडे येथील तळवण पुलाचं काम गेली अनेक वर्षे प्रलंबित होतं. ३० वर्षांपासून स्थानिकांकडून होत असलेली मागणी आता पूर्ण झालीय


- पर्यटकांच्या सुविधेसाठी शहरांना बायपास हायवे बांधले जात आहेत. इथंही रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या असली तरी महाराष्ट्राच्या तुलनेत खड्ड्यांची संख्या फारच कमी आहे


मांडावी पूल पूर्णपणे 'मेक इन इंडिया' संकल्पनेतून उभारला जातोय. नॅशनल हायवेवर वृक्षसंवर्धन थीमसाठी आम्हला ५० कोटी रुपये मिळालेत, अशी माहिती गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळीयेकर यांनी दिलीय. 


भूमी अधिग्रहणात अडचणी, पर्यावरणवाद्यांचा विरोध ही आव्हानं गोव्यातही आहेत. पण ती लिलया पार करीत राज्यात आधुनिक रस्त्यांचे जाळं उभं राहतंय. त्यामुळे भविष्यात गोव्यात रस्ते वाहतुकीचं संपूर्ण चित्रच बदललेलं असेल.


जगाच्या नकाशावर पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यानं गोव्यात रस्त्यांची उभारणी आणि कामाचा दर्जा याकडे विशेष लक्ष दिलं जातं. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्कृष्ट रस्त्यांसाठी गुजरात पाठोपाठ गोव्याचा नंबर लागला तर त्यात आश्चर्य वाटायला नको...