शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !
अनुदानीत शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती होण्याचा मार्ग मोकळा
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार आहे. लॉकडाऊनमुळे या भरतीला स्थगिती देण्यात आली होती. शिक्षण सेवकांची १२ हजार पदे भरण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली होती. त्यातील ६ हजार पदे भरण्यात आली, उर्वरित ६ हजार पदांची भरती लॉकडाऊनमुळे थांबवण्यात आली होती. आता ही ६ हजार पदांची भरती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. त्यामुळे अनुदानीत शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झालायं.
कोरोना काळात बंद असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेनंतर शैक्षणिक संस्थाचे संस्था प्रमुख, शिक्षण क्षैत्रातील विविध लोकप्रतिनिधी, शाळा मुख्याध्यापक यांनी शिक्षक भरतीवरील बंदी उठवण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री पवर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. शिक्षण मंत्र्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे असून विशेषतः गणित आणि विज्ञान शिक्षकांचा मोठा तुटवडा आहे. तसेच २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची उपस्थीती सातत्याने वाढताना दिसतेय. अशावेळी शिक्षण सेवकांच्या भरतीचा निर्णय होणे गरजेचे होते.
राज्यातील सहा हजार शिक्षकांच्या भरतीस तात्काळ मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेनुसार शिक्षण आयुक्तांच्या मार्फत भरती प्रक्रिया सुरू करत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.