नाशिकमध्ये `लाल कांदा` कडाडला
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्यानं चार हजारांचा टप्पा पार केला.
नाशिक : उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालल्यानं आणि लाल कांद्याची बाजारातील आवक लांबल्यामुळं कांद्याचा दर ४ हजार रुपये क्विंटलवर गेला आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्यानं चार हजारांचा टप्पा पार केला.
सरासरी दर ३ हजार २०० रूपये
कांद्याला जास्तीत जास्त ४ हजार ५९ रुपयांचा दर मिळाला. तर सरासरी भाव ३२०० रुपयांचा आहे. तर किमान दर १ हजार रुपयांपर्यंत मिळालाय. लासलगावमध्येही अशीच परिस्थिती आहे. लासलगाव बाजार समितीत ३ हजार ८०० रूपयांचा भाव मिळाला आहे. सरासरी दर ३ हजार २०० रूपयांचाच आहे.
लाल कांद्याची आवक कमी झाली
इतर राज्यांमधील लाल कांद्याची आवक कमी झाल्यामुळे दर वाढल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. इतर राज्यांमधून लाल कांद्याची आवक कमी झाली आहे. आवक वाढण्यासाठी अजून १५ ते २० दिवसांचा अवधी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलीय. मात्र तोपर्यंत कांद्याच्या दरात तेजी राहणार आहे.