COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : लातूर शहरातल्या मित्रनगर भागातली रविवारची सकाळ तशी इतर रविवारसारखीच शांत होती. नेमक्या त्याचवेळी इथल्या नाल्यात कुत्र्याचं पिल्लू अडकलं. त्यानंतर सुरु झाली त्या पिल्लाला सुखरुप बाहेर काढण्याची मोहीम. नेमकं काय झालं त्या पिल्लाचं पाहूयात ही बातमी...


लातूर शहरातल्या मित्रनगर भागातल्या एका अपार्टमेंटच्या पुढच्या नाल्यात सकाळी १० वाजल्यापासून कुत्र्याचं एक पिल्लू अडकलं होतं. ते पिल्लू जिवाच्या आकांतानं सुटकेसाठी केकाटत होतं. त्याच्या सुटकेसाठी काही जण सरसावलेही. त्यावेळी कामावरुन परतणाऱ्या कृष्णा तारळकर या मजुरानं आपल्याकडचं साहित्य, तसंच इतरांच्या मदतीनं नाल्यात अडकलेल्या त्या पिल्ला सुखरुप बाहेर काढलं. 


दरम्यान गटारातलं पाणी पिल्लाच्या नाकातोंडात गेलं होतं. त्यामुळे बाहेर काढल्यावर त्याला आधी स्वच्छ पाण्यानं धुऊन नंतर कपड्यानं स्वच्छ केलं गेलं. त्यानंतर त्याला दूध-बिस्कीटाचा खास खुराकही दिला गेला. 


या मुक्या जिवाची आर्त हाक ऐकून लोकं पुढे आली आणि सर्वांनी मिळून त्याची सुखरुप सुटका केली. भूतदयेचा हा एकत्रित प्रयत्न सर्वांनाच समाधानाची भावना देऊन गेला.