प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : शहरातच नाही तर ग्रामीण भागातही विवाहसोहळ्यात पैशांची वारेमाप उधळपट्टी केली जाते. त्यासाठी मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांकडून कर्ज (Loan) काढून किंवा उधारी घेऊन  दागदागिने, कपडे, बॅंड, डीजे, मंडप रोषणाई, फटाके, वऱ्हाडींसाठी वाहन व्यवस्था आणि जेवणावळींवर नको तेवढा खर्च केला जातो. अनेक ठिकाणी आर्थिक परिस्थिती नसतानाही विशेषत: नवऱ्या मुलाकडून वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. सध्या प्री-वेडिंग शूटची (Pre-Wedding Shoot) फॅशन आहे. त्यासाठी मोठा खर्च केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुर्जर समाजाचं क्रांतीकारी पाऊल
याशिवाय रिंग सेरेमनी (Ring Ceremoney), मेहंदी रसम (Mehandi Rasam) अशा विविध कार्यक्रमांमुळे लग्नाचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. अनेकदा वधु पित्याला तो भार सहन करावा लागतो आणि यातच तो कर्जबाजारी होतो. या सर्व अनावश्यक रूढी परंपरांना (Traditions) फाटा देत नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील गुर्जर बहुल (Gurjar Community) गावांनी क्रांतीकारी निर्णय (Revolutionary Decision) घेतला आहे.


काही अनिष्ट प्रथा गेल्या काही वर्षांपासून थेट ग्रामीण भागात पोहोचत आहेत. मात्र खर्चिक आणि संस्कृतीला प्रतिकूल अश्या कुप्रथा बंद व्हाव्यात यासाठी जिल्ह्यातील गुर्जर बहुल गावातून धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत. समाज हित समोर ठेवून उपवर-वधू कुटुंबीयांकडून याबाबत एकमुखी घोषणा केली जात आहे. समाजातील कुप्रथा बंद करण्याच्या या घोषणेचे सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे


कोरोनाच्या दोन वर्षाचा कालावधीनंतर पुन्हा एकाद धुमधडाक्यात विवाह सोहळे साजरे केले जात आहेत. जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर परिसरातील मध्यमवर्गीय विविध धर्मीयांच्या विवाह समारंभात आधुनिकतेच्या नावाखाली रिंग सेरेमनी, प्री-वेडिंग शूट, मेहंदी रसम, नाच गाणी आदी प्रकारांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू झाली आहे. आनंदोत्सव साजरा करताना यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होत आहे. 


गरज नसतांना उपवर-वधू पालकांकडून खर्चिक असलेल्या आणि भारतीय आदर्श संस्कृतीला बाधक ठरणाऱ्या अशा कार्यक्रमाचं आयोजन कशासाठी करावे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा सामाजिक कुप्रथांना हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील गुर्जर बहुल गावातून सध्या ठराव करण्यात येत आहेत. यासाठी कोरीट, बोरद, सावळदा , तराडी तबो, शिंदे, प्रकाशा, होळ मोहिदे, मोहिदा तह, मोहिदा तश ,बामखेडा आदि गावातील मुलींसह त्यांच्या पालकांनी पुढे सरसावत गावातून या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी ठराव संमत केले आहेत. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याच्या ठरावही संमत केला जात आहे.


 सुमारे पाच दशकांपूर्वी अण्णासाहेब पी.के.पाटील यांनी समाजातील हुंडा पद्धत बंदी तसंच पंक्तीतील अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याबाबत सामाजिक सुधारणा केली होती. आता गुर्जर समाजाचे विद्यमान अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील आणि प्रा.मकरंद पाटील तसंच त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शन आणि पुढाकारातून या प्रथा बंदीसाठी घेण्यात येणाऱ्या एकमुखी ठराव संमतीचे स्वागत करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गुर्जर बहुल गावांनी घेतलेल्या या हितावह निर्णयाचे अनुकरण इतरही समाज बांधवांनी करणे काळाची गरज ठरणारे आहे.