रिक्षाचालक ते रियल इस्टेट किंग... पाहा कोण आहेत अविनाश भोसले?
पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल सीबीआयने अटक केली, आणि ते पुन्हा चर्चेत आलेत
Avinash Bhosle Arrest : पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल सीबीआयने (CBI) अटक केली. येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. याआधी सीबीआयने मुंबई आणि पुण्यात छापे टाकले होते. याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता. सीबीआयने शनिवारी अविनाश भोसले, शाहीद बलवा आणि विनोद गोएंका यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर कारवाई केली होती. त्यानंतर अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली.
येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांनी दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये 3700 कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून गुंतवले. ज्यामध्ये डीएचएफएलकडून राणा कपूर यांना 600 कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचे समोर आले होते.
त्यानंतर डीएचएफएलनेही 3700 कोटी रुपये छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तसेच बलवा आणि गोएंका यांच्या कंपनीत वळती केली. यामुळेच छाब्रिया यांना या प्रकरणी अटक होताच सीबीआयने तात्काळ भोसले, बलवा व गोएंका या तिघांशी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक आहेत. त्यांची कारकीर्द आश्चर्यकारक अशीच आहे. अविनाश भोसले व्यावसायिक असले तरी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत, असं असलं तरी सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचा चांगला संपर्क आहे.
नोकरीच्या शोधात आले पुण्यात
अविनाश भोसले हे मुळचे सातारा जिल्ह्यातील तांबवे गावचे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं त्यांचं कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला आलं. यानंतर अविनाश भोसले नोकरीच्या शोधात पुण्यात आले. पुण्यातील रस्तापेठ भागात त्यांनी भाड्याने घर घेतलं, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला रिक्षा चालवली, हळुहळु त्यांनी यात जम बसवला आणि रिक्षा भाड्याने देण्याचा व्यावसाय सुरु केला. यासोबतच त्यांनी छोटीमोठी बांधकाम कंत्राट घेण्यास सुरुवात केली.
एबीआयएल ग्रुपची स्थापना
१९७९ मध्ये अविनाश भोसले यांनी ABIL ग्रुपची (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) स्थापना केली. यातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात जम बसवला. रस्त्याची लहान-मोठी कंत्राट त्यांना मिळाली. पण त्यांची खरी भरभराट झाली ती सेना-भाजप युती सरकारच्या काळात. या काळात त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाची शेकडो कोटींची कंत्राट मिळाली. याच माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी कालवे, धरणं बांधली.
त्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं. या सरकारशीही त्यांनी जुळवून घेतलं. पण कोट्यवधी रुपये खर्च करुनही राज्यातील सिंचन प्रकल्प रखडले. त्यानंतर अविनाश भोसले यांनी जलसंपदा विभागातील कामं कमी करुन इतर क्षेत्रांमध्ये उडी घेतली.
अलिशान बंगला आणि हेलिकॉप्टर
अविनाश भोसले यांच्या संपत्तीत दिवसेंदविस वाढ होत गेली. पुण्यातील बाणेर इथला त्यांचा अलिशान व्हाईट हाऊस बंगला आणि तीन हेलीकॉप्टर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पांढऱ्या रंगाच्या या बंगल्याचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखा आहे. इथंच भोसले यांची तिन्ही हेलिकॉप्टर्स असतात. अनेक राजकीय पक्षांचे पुढारी प्रचारासाठी अविनाश भोसले यांच्या हेलिकॉप्टरचा वापर करतात.
अविनाश भोसले यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क भागात उभारलेल्या हॉटेलच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
अँजेलिना जोलीचं भोसले यांच्या बंगल्यात
2006 मध्ये हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट हे दोघं एका चित्रपटाच्या शुटिंगसंदर्भात पुण्यात आले होते. यावेळी त्या दोघांच्या राहण्याची सोय अविनाश भोसले यांच्या बंगल्यातच करण्यात आली होती. याशिवाय अनेक पक्षाच्या बड्या नेत्यांनी बंगल्यात पाहुणचार घेतल्याचं बोललं जातं.