`साहेबांची उणीव नेहमीच...` विलासरावांबद्दल बोलताना रितेश देशमुखला अश्रू अनावर
Ritesh Deshmukh Emotional: साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्षे झाली, असे रितेश सांगत असतानाच भावूक झाला.
Ritesh Deshmukh Emotional: विलासराव आणि दिलीपरावांनी एकमेकांना जपलं. आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो, ही भावना एकमेकांनी कायम ठेवली. साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्षे झाली, असे रितेश सांगत असतानाच भावूक झाला. त्यांची उणीव नेहमीच भासते हे सांगताना त्याला हुंदका आला. पण त्याने स्वत:ला सावरुन भाषण सुरु ठेवले.
साखर कारखान्यात विलासरावांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. दिग्गज कॉंग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री झाल्यावर लातूर आले तेव्हा मांजरा सहकारी कारखान्यात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. पहिल्यांदा त्यांनी दादांच्या पायावर डोकं ठेवलं. भाषण करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यावेळी काका उठले आणि बाबांना म्हणाले कमॉन यू वील डू इट असं म्हणाले.
काकांनी उणीव भासू दिली नाही. काकांना मला बोलता आलं नाही. पण आज सर्वांसमोर सांगतो की काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असायला हवं याच जिवंत उदाहरण स्टेजवर आहे.
मुलगा, भाऊ, पिता म्हणून त्यांनी त्यांची भूमिका बजावली. आई वडिलांना पाहून लक्ष्मी-नारायणाचा जोडा असल्याचं मला वाटायचं. त्यांनी कधीच कोणाशी वरच्या भाषेत भाष्य केले नाही. त्यांनी कधीच अपशब्द वापरले नाहीत. त्यांच्या स्वभावाचा गुण आम्ही आयुष्यात आत्मसात करायचा प्रयत्न करतो. आईवडिलांनी आम्हाला कोणत्या गोष्टीपासून रोखले नाही. मुलांवर कोणताच दबाव आणला नाही,
तुम्ही अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण करा, हेच ते आम्हाला नेहमी सांगायचे. मुलांना आयुष्यात काय करायचंय ते करु द्यावे. मुलांच्या उड्डाणासाठी आपण हवा द्यावी...हे त्यांनी केल्याची आठवण रितेशने सांगितली.
साहेबांचा पुतळा येथे आहे. यातून विलासराव देशमुख एक व्यक्ती म्हणून प्रेरणा घेतली पाहिजे, असेही रितेशने यावेळी सांगितले. तसेच अमितभैया तुमच्याकडून लातुरकरांच्या खूप अपेक्षा आहेत. पण महाराष्ट्राच्याही खूप अपेक्षा आहेत, असं म्हणत त्यांनी अमित देशमुखांना शुभेच्छा दिल्या.