बापरे, शहर स्वच्छतेच्या नावाखाली क्लिन मार्शलकडून लूटमार
कल्याण डोंबिवली महापालिकेने नेमलेले क्लिन मार्शल शहर स्वच्छतेच्या नावाखाली लूटमार करत आहेत.
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने नेमलेले क्लिन मार्शल शहर स्वच्छतेच्या नावाखाली अक्षरशः लूटमार करत आहेत. 'झी २४ तास'ने हे व्हिडिओ चित्रित केले असून, त्यामध्ये स्वच्छता मार्शल कारवाईच्या नावाखाली जोरदार वसुली करत असल्याचं स्पष्ट दिसत आहेत. हे मार्शल नवख्या प्रवाशाला लक्ष्य बनवतात. त्याची झाडाझडती घेऊन त्याच्याकडून पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
ऑगस्ट २०१९ पासून कल्याण शहरासाठी ओरोकॉन आणि डोंबिवलीसाठी सिंग सिक्युरिटी या दोन एजन्सींना स्वच्छता मार्शल नियुक्त करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र नेमणुकीपासूनच हे मार्शल वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. तब्बल चौपट दंड ते वसूल करत असल्याचं आढळले आहे.
स्वच्छता मार्शलांच्या या सक्तीच्या कारभाराविरोधात नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यात, मात्र तरीही पालिका अधिकारी त्याकडे डोळेझाक करत आहेत.