`त्या` मुद्द्यावरून ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न; रोहित पवार यांचा आरोप
सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi ) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यभर गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. एका चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवला. त्यावेळी विरोधक शांत का होते असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
माझा सावरकर यांच्या बाबतीतला अभ्यास नक्कीच कमी आहे. अभ्यास करणे गरजेचे आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या बाबतीत अभ्यास आहे त्यामुळे आपण लढतो. पण, सावरकरांच्या बाबतीत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तकात नेमके काय मुद्दे आहेत हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे.
राहुल गांधींचा विरोध कमी होते पण शिंदे गटाचे काही लोक, भाजप आणि मनसे यामध्ये राजकारण करीत आहे. या मध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गट प्रयत्न करीत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
भारत जोडो यात्रेत गेल्यानंतर मी त्यांना दोन वेळा भेटलो. आदिशक्ती व भक्ती शक्तीची भेटवस्तू त्यांना दिली. उद्धव ठाकरे यांच्या फोटो संकलनाचे पुस्तक देखील त्यांना भेट दिले. ग्रामीण भागात सारखी शहरी भागात देखील रोजगार हमीची योजना यावी या आशयाचे निवेदन देखील मी त्यांना दिले पण ते सर्वांचे म्हणणे ऐकून घेतात लोक या यात्रेत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.
राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतरच असंतोष का? रोहित पवार यांचा सवाल
टिकलीचे प्रकरण राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर झाल. खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल एका मंत्र्याने खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केलं ते सुद्धा राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर झालं.
जितेंद्र आव्हाड यांना जेलमध्ये टाकले. त्यानंतर त्यांच्यावर वेगळी कारवाई करण्याचा प्रयत्न झाला. खासदार संजय राऊत हे जेलबाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांना काही संघटना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व गोष्टी राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतरच का घडत आहेत? असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला पडला आहे असे रोहित पवार म्हणाले.