आजोबांच्या पावलावर नातवाचं पाऊल, आमदार रोहित पवारांच्या हाती कोळपणी
आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन तिथले प्रश्न समजून घेतले.
कर्जत: महाराष्ट्राच्या राजकारणात आजोबा आणि नातू यांचं नातंच नाही तर राजकारणातील असलेलं स्थान यावरही अनेक चर्चा होत असतात. आजोबा आणि नातवाची नाळ ही शेतीशी जोडलेली आहे. हे वेळोवेळी आपल्याला दिसून येतं. आज पुन्हा एकदा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी हिच गोष्ट महाराष्ट्रात दाखवून दिली.
आमदार रोहित पवार पुन्हा एकदा शेतीच्या बांधावर शेतीची काम करताना दिसले. त्यांनी याचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. रोहित पवार यांच्या हातात यंत्र आणि शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणारी यंत्रही दिसत आहे.
'वेळेवर पाऊस पडल्याने मतदारसंघातली पिकं जोमात आलीत आणि सध्या खुरपणी, कोळपणीची कामं वेगात सुरू आहेत. नुकतंच कर्जतमध्ये दत्ता पाडुळे यांच्या शेतात यंत्राद्वारे कोळपणी सुरू असताना मीही ते यंत्र चालवून बघितलं. '
'यावेळी स्थानिक शेतकरी आणि इथं खुरपणाऱ्या महिला भगिनींसोबतही चर्चा केली'. असं कॅप्शन देऊन आमदार रोहित पवार यांनी कोळपणी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत.