विष्णू बुरगे, बीड : Beed Panchayat Samiti : बीड पंचायत समिती कार्यालयातून चोरी झाली आहे.  चक्क फाईल्सची चोरी झाल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, बोगस कामांची चौकशी होणार असल्यामुळे फाईल्सची चोरी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.  कोट्यवधींच्या घोटाळ्याच पाप झाकण्यासाठी हा प्रकार असल्याचा गंभीर आरोप, सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. (Rojgar Hami Yojana work files Theft from Beed Panchayat Samiti)


रोजगार हमी योजनेच्या फाईलची चोरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार आले आणि त्याचा अनेकांनी धसका घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. बीड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमधून रोजगार हमी योजनेच्या फाईलची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खिडकीचे गज काढून अज्ञात चोरट्याने फाईल्स चोरुन नेल्या आहेत. गैरव्यवहार काम लपविण्यासाठी फाईल्स गायब झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.


जुन्या मोडकळी झालेल्या इमारतीत महत्त्वाची कागदपत्रे


बीड शहरातील पंचायत समितीचे जुन्या इमारतीतील काम नवीन इमारतीत सुरु होऊन तीन महिने झालेत. असे असताना जुन्या मोडकळी झालेल्या इमारतीमधील महत्त्वाची कागदपत्रे नव्या इमारतीमध्ये आणली गेली नाहीत. यामुळेच जुन्या पंचायत समितीच्या रोहियोच्या कार्यालयामधील महत्त्वाच्या फाईल चोरीला गेल्याचे चर्चा आहे.



सामाजिक कार्यकर्त्याचा गंभीर आरोप 


बीड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे कागदोपत्री करुन कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यानी केला आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी वारंवार केली जात होती. या मागणीनंतर पंचायतराज समिती बीड जिल्ह्यात झालेल्या रोहयोच्या कामाचे ऑडिट करण्यासाठी येणार असल्याचे असल्याचे लक्षात येतात पंचायत समितीमधील रोजगार हमी योजनेच्या जुन्या फाईल चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे घोटाळा समोर येऊ नये म्हणून हा प्रकार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.


याआधी देखील मोठ्या प्रमाणात चुकीची कामे केली गेलीत. तसेच कागदोपत्री कामे दाखवून कोट्यवधी रुपयाचा निधी लाटला गेलाय. हा गैरव्यवहार झाकण्यासाठी हा प्रकार केला आहे. त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.


बीड पंचायत समितीअंतर्गत गेल्या एक दोन वर्षांमध्ये अनेक रोहयोची कामे झाली आहेत . या कामाच्या सर्व फाईल्स जुन्या इमारतीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. यात मोजमाप पुस्तिका , हजेरी पत्रक , प्रशासकीय खर्चाचे सर्व उपप्रमाणके , मस्टर, टँकर नोंद वही , तांत्रिक मान्यता संचिका यासह आदी फाईलींचा समावेश होता. याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी दिली. तसेच घोटाळ्यासंदर्भात विचारले असता त्यांनी केलेला आरोप फेटाळला.