Roshni Shinde beaten in Thane : ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत मारहाण केली. यात रोशनी शिंदे या जखमी झाल्यात. त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रोशनी शिंदे यांनी माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास कोण जबाबदार, असा सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोशनी शिंदे सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. रोशनी शिंदे यांना मुका मार लागला आहे. तसेच त्यांच्या पाठीवर माराच्या खुणा आढळल्या आहेत, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. आलेगावकर यांनी सांगितले. मात्र अंतर्गत रक्तस्त्राव किंवा फ्रॅक्चर आढळलेलं नाही, असे ते यावेळी म्हणाले. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांनी आपल्यावर ट्रीटमेंट सुरु असतानाही आपल्याला मारहाण करण्यात आली, असा आरोप केलाय. पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड त्रास होत असूनही पोलिसांनी दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केलाय. मात्र माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळलेत. 


हा जीवघेणा हल्ला 15 ते 20 महिलांच्या गटाने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना सोमवारी रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली.  कासरवडवली येथील रोशनी शिंदे यांच्या कार्यालयातून बाहेर पडण्याच्या वेळीच त्यांच्यावर शिंदे गटाच्या महिलांनी हा हल्ला केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात कासरवाडवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यास नकरा दिला, असा आरोपही करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी  ठाकरे गटाकडून आक्रमक पवित्रा घेतला परंतु पोलिसांनी दखल घेतलेली नाही, असे सांगण्यात आले.


राज्यात या सरकारच्या काळात हल्ले घडवून आणण्यात येत आहे.  ठाण्यात सरकार पुरस्कृत हल्ला घडवून आणला आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच झालीय, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाण्यात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे राज्य आहे की नाही, असा सवाल राऊत यांनी केला आहे.


त्याचवेळी त्यांनी पोलिसांनाही इशारा दिला आहे. आम्हालाही हल्ला करता येतो. ठाण्याच्या पोलिसांनी हातात बांगड्या भरल्या आहेत का? एका महिलेवर हल्ला केला जात आहे. हल्ल्या करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. राज्यात कायदा आहे आहे का ? हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन होत आहे. तुम्ही पोलिसांना बाजुला ठेवा, मग बघा?, आम्हालाही हल्ला करता येतो. त्यावेळी समजेल काय हल्ला असतो तो, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.