फौजदारानेच मशिदीसमोरच लावला हनुमान चालीसेचा भोंगा; पोलिसां ठाण्यात गुन्हा दाखल
देशभरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाने राजकारण तापलेले आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये एका पोलिसानेच अजान सुरू असताना त्या दिशेने भोंगा लावल्याचा प्रकार समोर आला आहे
औरंगाबाद : देशभरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाने राजकारण तापलेले आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये एका पोलिसानेच अजान सुरू असताना त्या दिशेने भोंगा लावल्याचा प्रकार समोर आला आहे. अजान सुरू असताना मशिदीच्या दिशेने हनुमान चालिसा आणि इतर धार्मिक गाणी या फौजदाराने वाजवली.
रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या फौजदाराने मशिदीच्या दिशेने हनुमान चालिसा लावली. यावेळी मशिदीच्या भोंग्यावरून अजान सुरू होती. सातारा पोलीस ठाण्यात किशोर मलकूनाईकविरोधात शांतता भंग केल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवण्यात आला. रविवारी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
किशोर सध्या परळी येथे कार्यरत आहेत. शनिवारी त्यांनी त्यांच्या इमारती समोरील मशिदीच्या दिशेने लाऊडस्पीकर लाऊन हनुमान चालिसा वाजवली. पोलिसांना ही बाब समजताच जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने शांतता भंग होऊ केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.