Rs18000 Crore Project Shifted To Gujarat: राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी 18 हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याच्या आरोपावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. नागपूरमध्ये गुरुवारी रात्री प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांना वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवरुन प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी वडेट्टीवारांवरच निशाणा साधला.


वडेट्टीवार यांनी काय दावा केला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे," अशा मथळ्याखाली वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन गुरुवारी पोस्ट केली होती. "महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाअंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे," असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता.


"वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे," असा दावा वडेट्टीवार यांनी केला. तसेच पुढे बोलताना, "हिंदू - मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा... सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत," असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.



या आरोपांवर फडणवीस काय म्हणाले?


देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याच्या वडेट्टीवारांच्या आरोपावर प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला. "विरोधी पक्ष नेत्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे," असा टोला फडणवीसांनी लगावला. पुढे बोलताना, "बातमी आली म्हणून लगेच माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे आता बंद केल पाहिजे. आज अक्षरशः विरोधी पक्ष नेत्यांना तोंडावर पडावं लागलं. उद्योग बाहेर गेला नाही असा खुलासा त्या कंपनीने केला आहे. महाराष्ट्रात कमिटमेंट केलं तो उद्योग उभारणारच, त्याव्यतिरिक्त उद्योग आणणार असल्याचा खुलासा कंपनीने केला," असं फडणवीस म्हणाले. "उद्योगासंदर्भात बातमी करताना पत्रकारांनी सुद्धा त्याची खात्री करून घेतली पाहिजे. अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यानंतर किमान त्या कंपनीशी खात्री करून घ्यावे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते. विरोधी पक्षनेते यातून बोध घेतील," असा चिमटाही फडणवीसांनी काढला.


मोदींच्या वर्धा दौऱ्यावरही भाष्य


नरेंद्र मोदींच्या आजच्या वर्धा दौऱ्यासंदर्भातही फडणवीसांनी गुरुवारी रात्री प्रतिक्रिया नोंदवली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वीसुद्धा दौऱ्यावर आलेले आहे. विश्वकर्मा ही अतिशय सुंदर योजना आहे. सगळ्या लाभार्थ्यांच एक प्रकारच संमेलन वर्ध्यात होत आहे. यानंतर सुद्धा अनेक दौरे महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाहायला मिळतील," असं फडणवीस म्हणाले.