कधीकाळी चेष्टेचा विषय ठरलेल्या `आरएसएस`ची आज विरोधकांनाही भुरळ
संघटनात्मक कामाबरोबर संघाचं संस्थात्मक कामही मोठं आहे. शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, दलितांपासून आदिवासींपर्यत अशा विविध क्षेत्रांत हे काम पसरलेलं आहे.
अरुण मेहेत्र, झी २४ तास, पुणे : देशातील राजकारण एकाच पक्षाभोवती केंद्रीत झालं असताना या पक्षाची मातृसंस्था असलेल्या संघटनेची भुरळ विरोधी विचाराच्या लोकांना पडू लागलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार नाही, पण आचार अंगिकारण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षासह स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या सामाजिक चळवळींतील कार्यकर्त्यांना भासू लागलीय.
देशभरात ५० हजारांहून अधिक शाखा, सुमारे ५१ लाख स्वयंसेवक, ५० हजारांहून जास्त गावांमध्ये नियमित संपर्क आणि जगातील ४७ देशांमध्ये कार्य विस्तार... १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा संख्यात्मक आलेख. विशेष म्हणजे २०१३ नंतर म्हणजे देशात भाजपची सत्ता आल्यानंतर संघाच्या शाखा तसंच स्वयंसेवकांमध्ये प्रतिवर्षी २९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय. त्याचप्रमाणे संघाची राजकीय आघाडी असलेल्या भाजपचे देशात सुमारे १० कोटी सभासद आहेत ही बाब देखील तितकीच लक्षणीय. याचा अर्थ देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जनाधार वाढतोय. त्याची कारणं अनेक असली तरी संघ स्वयंसेवकाची कामाप्रति असलेली निष्ठा, त्यांच्या ठायी असलेली चिकाटी विरोधकांसाठी केवळ कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय ठरत आहे.
म्हणूनच की काय, 'राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही आरएसएसचं अनुकरण करत जनतेपर्यंत पोहोचायला हवे. जनतेच्या समस्यांवर आवाज उठवला पाहिजे. घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधला पाहिजे. संघाप्रमाणे प्रचाराची यंत्रणा उभारली पाहिजे. त्यासाठी तन-मन अर्पण करून काम केले पाहिजे. तेव्हाच मोठे यश मिळवणे शक्य आहे. संघ आणि भाजपच्या याच रणनीतीमुळे आज देशभरात कमळ उमलले आहे', असा कानमंत्र शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
संघटनात्मक कामाबरोबर संघाचं संस्थात्मक कामही मोठं आहे. शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, दलितांपासून आदिवासींपर्यत अशा विविध क्षेत्रांत हे काम पसरलेलं आहे. संघाचा कार्यकर्ता अशा कामासाठी आवर्जून वेळ देतो. इतर संघटना तसंच चळवळींमध्ये ती वृत्ती दिसून येत नाही. याची चिंता आज पुरोगामी विचारवंतांना क्षणोक्षणी सतावतेय.
कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विरोधकांच्या चेष्टेचा तसेच शिव्याशापाचा विषय होता. आज तो त्यांच्या चिंतनाचा विषय बनलाय. संघाच्या विचाराची आवश्यकता तसेच तो समाजात कितपत रुजलाय याविषयी मतमतांतरं असू शकतात. मात्र संघटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संघानं स्वीकारलेली कार्यपद्धती ही आज सर्वदूर मान्यता पावत असल्याचं नाकारता येणार नाही.