`महाराष्ट्राच्या जनतेचा रोष कोणावर समजून घ्या`, RSS च्या टीकेवरुन अजित पवार गटाचा संताप; म्हणाले, `आम्हाला पण..`
NCP Ajit Pawar Group Slams RSS: एकनाथ शिंदे आणि भाजपाला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपस्थित केला होता. त्यावर आता अजित पवार गटाने उत्तर दिलं आहे.
NCP Ajit Pawar Group Slams RSS: भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमत असतानाही अजित पवारांना का सोबत घेतलं? असा प्रश्न विचारणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता अजित पवार गटाने जशास तसं उत्तर दिलं आहे. भाजपाची मातृक संस्था असलेल्या आरएसएसच्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्रामधून महाराष्ट्रातील लोकसभा निकालांचे विश्लेषण करताना अजित पवार गटाला सोबत घेतल्याने जुन्या समर्थकांमध्ये नाराजी परसली आणि त्याचा फटका बसला, असं म्हटलं आहे. यावरुनच राज्यातील राजकारण्यांकडून वेगवगेळ्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेल्या असतानाच आता थेट अजित पवार गटानेच या टीकेवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आरएसएसने नेमकं काय म्हटलेलं?
'ऑर्गनायझर’ मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लिहिलेल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील कामागिरीवर विशेष नाराजी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रात भाजप व शिंदेंची शिवसेना यांच्याकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले, हा प्रश्नच आहे, असं या लेखात म्हटलं आहे. "अनावश्यक राजकारण तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे पाहता येईल. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असतं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. खरं तर भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं. पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला अंतर्गत कलहामुळे उतरती कळा लागली असती," असं 'ऑर्गनायझर'मध्ये म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 85000 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोध
अजित पवार गटाने काय म्हटलं?
अजित पवार गटाचे प्रवक्ते तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या सूरज चव्हाण यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या टीकेला उत्तर दिलं आहे. "भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजित दादांमुळे!" असं म्हणत सूरज चव्हाण यांनी टोला लगावला आहे. "महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष कोणावर आहे हे समजून घ्या. लिहिता आणि बोलता आम्हाला पण येते," असा सूचक इशारा सूरज चव्हाण यांनी दिला आहे. "लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका," असंही पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
"महायुतीशी संबंध नाही ते..."
'झी 24 तास'शी बोलताना सूरज चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "लेख वाचल्यावर मला असं जाणवलं की अनेकदा निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर असं म्हटलं जातं की संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे भाजपाचा विजय झाला. अशी स्टेटमेंट आम्ही ऐकली होती. महायुतीमध्ये जी काही पिछेहाट झाली त्यामध्ये आमचे वरिष्ठ नेते विचारविनिमय करतील. पण विजय झाल्यावर श्रेय घ्यायला यायचं आणि पराजय झाल्यानंतर त्याचं खापर फक्त अजित पवारांवर फोडायचं, हे माझ्यासारख्या राष्ट्रवादीत काम करणाऱ्या अजितदादाप्रेमी कार्यकर्त्याला आवडलेलं नाही. अशापद्धतीने ज्यांचा महायुतीशी संबंध नाही ते हे म्हणतात. त्यांनी महायुतीसंदर्भात एवढी टीका का करावी? असा प्रश्न सूरज चव्हाण यांनी विचारला.