राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे वयाच्या ९७ वर्षी येथे निधन झाले.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे वयाच्या ९७ वर्षी येथे निधन झाले. (RSS veteran M G Vaidya passed away at 97 in Nagpur) आज दुपारी ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचे राहते घर- ८०, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-२२ येथून निघणार आहे. अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
मा. गो. वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे संपूर्ण नाव माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य. त्यांच्या पश्चाेत पत्नी, तीन मुली तसेच पाच मुले असा मोठा आप्त परिवार आहे.
त्यांचे मुलगेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहेत. त्यापैकी डॉ. मनमोहन हे संघाटे सह सरकार्यवाह, तर श्रीनिवास, शशिभूषण आणि डॉ. राम हे हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते कोरोनातून बरे झाले होते. आज दुपारी त्यांना हृदय विकाराचा धक्का बसल्याने त्यांना स्पंदन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करणयात आले.
मा.गो. वैद्य यांचा अल्प परिचय
अफाट वाचन, तरल बुद्धीमत्ता आणि निर्भीड पत्रकारिता यांचा संचय म्हणून सर्वज्ञात असलेले माधव गोविंद अर्थात मा.गो. वैद्य अवघ्या देशाला परिचीत होते. आतापर्यंत तब्बल १९ ग्रंथ लिहीले आहेत. संस्कृतचे प्राध्यापक राहिलेले मा. गो. वैद्य यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला . मात्र पत्रकारितेतील त्यांचे योगदान अनन्यसाधारण मानले जाते.
वर्धा जिल्ह्यातील तरोडा गावात ११ मार्च १९२३ रोजी जन्मलेले वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पायाभरणीचे साक्षीदार आहेत. संघ परिवारात बाबुराव या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या वैद्य यांचे प्राथमिक शिक्षण तरोडा येथे झाले. त्यानंतरचे त्यांचे सर्व शिक्षण नागपुरात झाले. नागपुरातील डीडी-नगर विद्यालयातून १९३९ साली त्यांनी मॅट्रीकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीण केली. त्यानंतर १९४४ साली संस्कृत विषयातून प्रथम श्रेणीत बीएची पदवी संपादीत केली. तर १९४६ मध्ये वैद्य प्रथम श्रेणीत एमएची परीक्षा उत्तीण झालेत. पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांमध्ये त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले होते.
उच्च विद्याविभूषीत सदरात मोडणारे शिक्षण प्राप्त केल्यानंतर १९४६ ते १९४९ या कालावधीत त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. न्यू ईरा हायस्कूलपासून सुरू झालेल्या शिक्षकी पेशाचा प्रावस हिस्लॉप कॉलेजच्या प्राध्यापक पदावर जाऊन ठेपला. त्यांनी १९६६पर्यंत हिस्लॉप महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्यांच्या करिअरला अचानक कलाटणी मिळाली. त्यांच्याकडे दैनिक तरूण भारतची जबाबदारी सोपवण्यात आली. वर्तमानपत्राचे मुख्य संपादक ते नरकेसरी प्रकाशनचे असा त्यांचा कार्यालेख राहिला. त्यानंतर १९७८ ते १९८४ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यपदही भूषविले.