नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : कट्टा म्हटलं की आपल्याला आठवतो मित्र मंडळींचा गप्पा मारण्याचा कट्टा... पुण्यात मात्र एक वेगळाच कट्टा भरतो. कोणता आहे हा कट्टा आणि काय आहे त्याचं वैशिष्ट्य. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या या चित्तरंजन वाटिकेत दर रविवारी सकाळी न चुकता एक कट्टा भरतो. या कट्ट्याचं नाव आहे माहिती अधिकार कट्टा. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जानेवारी २०१४ मध्ये हा कट्टा सुरु केला. त्याला आता पावणे चार वर्ष झाली आहेत. 


महापालिकेच्या बागेत भरणा-या या कट्ट्यात ना कोणती प्रवेश फी आहे, ना कसलं बंधन. शासकीय यंत्रणेनं पिडलेले, अडवणूक होत असलेले नागरिक या कट्ट्यावर प्रामुख्यानं येऊन आपल्या अडचणी मांडतात. इथं त्यांना समस्येबाबत मार्गदर्शन तर मिळतंच, सोबतच माहिती अधिकाराचा अर्ज आणि तो भरायची आणि माहिती मागवायची माहितीही मोफत मिळते. मात्र माहिती अधिकाराची ही लढाई स्वतःच लढायची हीच इथली मुख्य अट आहे. 


हा कट्टा सुरु झाल्यापासून आतापर्यंतच्या दोनशे आठवड्यांत साधारण सहा हजार नागरिकांनी इथे हजेरी लावली आहे. दरम्यान माहिती अधिकार कायदा आला, त्यानंतर सेवा हमी कायदाही आलाय. मात्र सामान्य नागरिकांची शासकीय यंत्रणेमार्फत होणारी अडवणूक अजूनही कमी  झालेली नाही. त्याचवेळी लोकांमध्ये आपल्या हक्कांबाबत जागरुकता वाढत आहे हेच वास्तव, या माहिती अधिकार कट्ट्यावरच्या सततच्या वाढत्या गर्दीतून समोर येतंय.