प्रफुल्ल पवार, अलिबाग : रायगड जिल्हयातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या म्हसळा तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडालाय . कोटयवधी रूपये खर्चून बांधलेल्या इथल्या ग्रामीण रूग्णालयाचे उदघाटन होवून 3 वर्षे पूर्ण झाली , मात्र त्याठिकाणी  अधिकारी ,  कर्मचारीच नसल्याने त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र चालवण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय दुर्गम, डोंगराळ तालुका अशी ओळख असलेला म्हसळा तालुका.शंभरहून अधिक गावं, वाड्यांचा समावेश असलेल्या या तालुक्याची लोकसंख्या साधारण पन्नास हजारांच्या घरात आहे... पण या लोकसंख्येसाठी पुरेशी आरोग्य यंत्रणाच उपलब्ध नाही...सुनील तटकरे हे रायगडचे पालकमंत्री असताना तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्चून इथं ग्रामीण रुग्णालयाची आलिशान वास्तू उभारण्यात आली. काम पूर्ण झालेलं नसतानाही 3 वर्षांपूर्वी 25 मे 2014 ला या इमारतीचं उदघाटनही करण्यात आलं.


परंतु इथं सेवा द्यायला ना डॉक्टर आहे... ना कर्मचारी... आजही याठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू झालेलं नाही... जी काही यंत्रसामुग्री उपलब्ध झाली ती अशी धूळखात पडलीय... सोय म्हणून म्हसळ्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र या इमारतीत हलवण्यात आलंय. आरोग्य यंत्रणाच उपलब्ध नसल्यानं अनेकदा रुग्णांना तातडीनं श्रीवर्धन किंवा माणगावला हलवावं लागतं... त्यात वेळ आणि पैसा वाया जात आहे. रुग्णाच्या आरोग्याशी इथे खेळ सुरु आहे.


म्हसळा तालुक्यात 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषदेचा एक दवाखाना आहे. परंतु इथली निम्म्याहून अधिक पदं रिक्त आहेत. 83 मंजूर पदांपैकी केवळ निम्मी पदं भरलेली असून एवढ्या कमी कर्मचारी वर्गात सेवा देताना आरोग्य यंत्रणेचीही ओढाताण होताना दिसते. म्हसळा तालुक्यात अलीकडच्या काळात काविळबरोबरच विंचूदंशांचं प्रमाणही वाढलंय. अशावेळी सरकारी यंत्रणेलाही खाजगी सेवेवरच अवलंबून रहावं लागतं. दुसरीकडे या इमारतीच्या उद्घाटनापूर्वी आक्रमक असलेली शिवसेना आता मूग गिळून गप्प आहे.



एकीकडे आरोग्य यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चाललाय, अशा स्थितीत मुंबईपासून जवळ असलेल्या रायगडमधील म्हसळयात चांगली आरोग्य सेवा मिळणार तरी केव्हां, असा प्रश्न् उपस्थित करण्यात येत आहे.