कुस्तीमधील भीष्माचार्य हरपला; रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले यांचे निधन
महाराष्ट्रात कुस्तीचा सुवर्णकाळ सुरु असताना दादू चौगुले यांनी अनेक समकालीन मल्लांना अस्मान दाखवले होते.
कोल्हापूर: कुस्तीच्या जागतिक नकाशावर महाराष्ट्राचा झेंडा रोवणारे रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले यांचे रविवारी कोल्हापूरात निधन झाले. तीन दिवसांपूर्वी त्यांना धाप लागल्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. उपचार सुरु असताना ते कोमात गेले. अखेर आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
लाल मातीच्या मैदानासोबत मॅट कुस्तीत हातखंडा असणारे दादू चौगुले हे महाराष्ट्रातील अनेक मल्लांचे प्रेरणास्थान होते. कुस्तीचा प्रसार, संघटन आणि प्रशिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या दादू चौगुले यांचा सरकारने मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला होता. महाराष्ट्र शासनाने १९७४ साली त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले होते. महाराष्ट्रात कुस्तीचा सुवर्णकाळ सुरु असताना दादू चौगुले यांनी अनेक समकालीन मल्लांना अस्मान दाखवले होते. त्यांनी वस्ताद हिंदकेसरी गणपत आंदळकर आणि बाळू बिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. यानंतर त्यांनी झपाट्याने कुस्तीच्या क्षेत्रात नाव कमावले.
१९७० साली परशुराम पाटील यांना पराभूत करून ‘महाराष्ट्र केसरी’, १९७३ साली दीनानाथसिंग यांना अवघ्या एका मिनिटात नमवून ‘रुस्तम-ए-हिंद’ आणि याच वर्षी दिल्लीच्या नेत्रपाल यांना लोळवून ‘महान भारत केसरी’ या मानाच्या गदा चौगुले यांनी आपल्या खांद्यावर मिरवल्या. तर ९७३ साली ऑकलंड या न्यूझीलंडच्या राजधानीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १०० किलो वजनी गटात फ्री स्टाइल प्रकारात त्यांनी रौप्यपदकावर नाव कोरले होते.